बातम्या
जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षार्थींसाठी बुधवारी मोफत मार्गदर्शन
By nisha patil - 5/8/2024 9:14:52 PM
Share This News:
जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व परीक्षार्थींसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात 'स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन सत्र' आयोजित करण्यात आले आहे.
निवड आयआरएस अक्षय नेर्ले व निवड उपजिल्हाधिकारी विनायक पाटील हे या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थी व परीक्षार्थ्यांनी उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढण्यासाठी तसेच या परीक्षांमध्ये जिल्ह्यातील युवकांचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दर महिन्याला 'स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिर' घेण्यात येत आहे.
महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागातील संधी, त्यासाठी होणाऱ्या परीक्षा, आवश्यक पात्रता, यासाठीची तयारी आदींबाबत मार्गदर्शन करत आहेत. यासह आपल्या अनुभवाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, अभ्यासाचे नियोजन कसे असावे, प्राथमिक तयारी करणाऱ्यांनी नेमकी सुरुवात कशापासून करावी आदी विविध पातळींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्यात विविध अधिकारी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना माहिती देणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा फायदा होईल, अशी माहिती करवीरचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षार्थींसाठी बुधवारी मोफत मार्गदर्शन
|