बातम्या

अमृत २.० अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस रु.१३९.०८ कोटींचा निधी मंजूर; .राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश

Fund of Rs 139 08 Crore sanctioned to Kolhapur Municipal Corporation under Amrit 2 0 Mission


By nisha patil - 5/7/2024 7:17:39 PM
Share This News:



कोल्हापूर दि.०५ : केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाची सन २०२१-२२ वर्षापासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत पाणीपुरवठा, सरोवरांचे पुनरुज्जीवन व हरित क्षेत्र विकास इ. पायाभूत सुविधांची निर्मिती राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. अमृत अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील ४४ शहरांमध्ये मलनि:स्सारणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार सदर अभियानांतर्गत राज्याच्या रु. २७७९३ कोटी प्रकल्प किंमतीच्या राज्य जलकृती आराखड्यास  केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा समावेश असून, या अभियानाअंतर्गत दि.०४ जुलै २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे कोल्हापूर महानगरपालिका मलनिस्सारण प्रकल्पास रु.१३९.०८ कोटींच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास पुन्हा यश आले असून, यापूर्वी राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने याच अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस रु.१५२.४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

    मंजूर झालेल्या निधी बाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी माहिती देताना, अमृत २.० अभियानाअंतर्गत आवश्यक प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून यापूर्वी १५२.४० कोटींचा प्रस्ताव सादर केला होता त्यास मंजुरी मिळून कामास सुरवात झाली आहे. यानंतर पुन्हा या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात रु.१३९.०८ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यामध्ये मलनिस्सारण प्रकल्पाअंतर्गत बापट कॅम्प व वीट भट्टी येथील एस.टी.प्लांट उभारणे, सांडपाण्याचे संकलन आणि वाहतूक व्यवस्था, पूर्ण गुरुत्वाकर्षण गटार करणे, सांडपाणी पंपिंग स्टेशन उभारणे,  पंपिंग मशिनरी, राईजिंग मेन नेटवर्क, सर्वेक्षण कार्य, जनरेटर प्लॅटफॉर्म उभारणे,  एस.टी.पी.प्लांट येथे प्रक्रिया केलेले पाणी निर्गत करणे यासह इतर कामांचा समावेश आहे, असल्याची माहिती दिली.
     
    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन वर्षात कोल्हापूर जिल्ह्याला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून, अमृत २.० योजनेतून मलनिस्सारण प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल कोल्हापूरवासीयांच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचेही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सांगितले.


अमृत २.० अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस रु.१३९.०८ कोटींचा निधी मंजूर; .राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश