बातम्या

गणेशोत्सव मिरवणुकींवरील निर्बंध शिथिल करण्याची शिवसेनेची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

Ganeshwtsav


By nisha patil - 8/23/2024 5:26:05 PM
Share This News:



गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याची परवानगी मंडळांना दिली जाणार आहे. इतर दिवशी विनापरवानगी कोणी मिरवणूक काढल्यास मंडळांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. याबाबत मंडळामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याशेजारील सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा कोणताही निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला नसून, फक्त कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरातच या नियमाची अंमलबजावणी केली जात आहे. हि बाब अन्यायकारक आहे. त्यामुळे गणेशोत्सव मिरवणुकींवर घातलेले निर्बंध तात्काळ शिथिल करावे, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची आज भेट घेतली.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव सन कोल्हापुरात साजरा केला जातो. कोल्हापूरच्या गणेशोत्सवास शतकोत्तर परंपरा लाभली आहे. या कालावधीत शहरातील वातावरण भक्तीमय असते. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनेही मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या मंडळाच्यावतीने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवात जनभावना जोडल्या गेल्या आहेत. आपल्या लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन व विसर्जन व्हावे, यासाठी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. परंतु, एकाच दिवशी पारंपारिक वाद्य, मे.सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाधिन राहून साऊंड सिस्टम उपलब्ध होत नाही. यासह त्यांचे दरही आवाक्याबाहेर असल्याने अनेक मंडळे आपल्या गणरायाचे आगमन गणेशोत्सवापूर्वीच करतात. यामुळे गणेशोत्सवादिवशी शहरात होणारी गर्दी आवाक्यात राहण्यास प्रशासनासही मदत होते. प्रशासनाच्या या भुमिकेमुळे या मिरवणुकांवर चरितार्थ अवलंबून असलेल्या घटकांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यासह गणेशोत्सव मंडळांनाही आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळात गणेशोत्सव मंडळांवर लावण्यात आलेले निर्बंध तात्काळ शिथिल करून गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशीसह इतर दिवशीही नियामाधीन राहून गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास मंडळांना परवानगी द्यावी अशी मागणी केली.

 

*अटक केलेल्या हिंदू बांधवांची तात्काळ सुटका करा*

 

 आज कोल्हापूर बंदच्या हाकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाआरती साठी जमणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याना पोलीस प्रशासनाने अटक केली. हीच तत्परता परवाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावेळच्या मोर्चामध्ये दिसून आली नाही. ही बाब अन्यायकारक आहे. आम्ही शांततेने महाआरती करणार होतो पण प्रशासनाने अटकेची कारवाई केली ही अत्यंत चुकीची बाब असून, अटक केलेल्या हिंदू बांधवाची तात्काळ सुटका करावी, अशी जोरदार मागणीही यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे केली.

 

यावेळी शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, रमेश खाडे, अमोल माने, दीपक चव्हाण, अनुसूचित जाती जमाती सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, गणेश रांगणेकर, सुरेश माने, राज जाधव, अश्विन शेळके, दादू शिंदे, प्रभू गायकवाड, कपिल सरनाईक, पियुष चव्हाण, अविनाश कामते, विकास शिरगावे, क्रांतीकुमार पाटील, आकाश झेंडे, कृपालसिंह राजपुरोहित आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 


गणेशोत्सव मिरवणुकींवरील निर्बंध शिथिल करण्याची शिवसेनेची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट