बातम्या

आमदारकीची एक संधी द्या,आंबेओहोळच्या पुनर्वसनचा प्रश्न पहिल्याच बैठकीत मार्गी लावतो -समरजितसिंह घाटगे

Give MLA a chance the question of rehabilitation


By nisha patil - 10/30/2024 7:18:40 PM
Share This News:



आमदारकीची एक संधी द्या,आंबेओहोळच्या पुनर्वसनचा प्रश्न पहिल्याच बैठकीत मार्गी लावतो
 समरजितसिंह घाटगे 

पालकमंत्र्यांनी सत्तावीस बैठका घेऊनही पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित का?

उत्तूर,प्रतिनिधी. चित्रीकार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आंबेओहोळ प्रकल्पाकडे पाहिले जाते.त्यांच्या पश्चात निधीअभावी रखडलेल्या या प्रकल्पासाठी 227.54 कोटी रुपयांचे निधी उपलब्धतेतून या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे भाग्य मला लाभले.गेल्या पाच वर्षापासून या धरणामध्ये पाणी साठवले जात आहे.मात्र पालकमंत्र्यांनी 27 बैठका घेऊनही या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित का आहेत? असा खडा सवाल उपस्थित करत आमदारकीची एक संधी द्या, पहिल्याच बैठकीत हा प्रश्न मार्गी लावतो. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह  घाटगे यांनी केले.
 होन्याळी (ता. आजरा) येथे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच स्मिता पाटील होत्या. 

घाटगे  पुढे म्हणाले, मतदार संघाच्या विभाजनानंतर उत्तूर  विभागामध्ये स्वर्गीय कुपेकर यांनी पालकमंत्र्यांना  पुढे केले.आंबेओहोळ प्रकल्पाच्या पूर्णत्वातून कुपेकर साहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची जबाबदारी होती. मात्र पंचवीस वर्षे आमदार व मंत्री विशेषता जलसंपदा खात्याचे मंत्री असतानाही त्यांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे दुर्लक्ष केले.आम्ही निधी उपलब्ध केल्यानंतर या धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र अद्यापही पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक वेळी पालकमंत्री पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध झाल्याचे पत्र वाटप करतात.आचारसंहितेमध्ये अशा पत्रांचे वाटप करून ते शेतकऱ्यांची केवळ दिशाभूलच करत नाहीत तर या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेत. तालुक्यातील विकास कामांप्रमाणे या पुनर्वसनाच्या प्रश्नातही त्यांचे ठेकेदार या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून त्यांची फसवणूक करत आहेत.

शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भिकाजी मोरबाळे म्हणाले,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह  घाटगे  यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक जिवाचे रान करतील.


राजेंना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-काॕ.संपत देसाई 

श्रमिक मुक्ती दलाचे राज्यस्तरीय नेते कॉम्रेड संपत देसाई म्हणाले,ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यामुळे गतवेळी आम्ही पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला.मात्र त्यांनी उत्तूर  विभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले. विशेषतः आंबेओहोळसारख्या प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मंत्री असूनही त्यांना सोडविता आला नाही. ही धमक छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे  यांच्याकडे आहे. जनतेच्या सुखदुःखामध्ये समरस झालेल्या राजेंना यावेळी आम्ही पाठिंबा दिला असून त्यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

यावेळी एस एस पाटील, उपसरपंच तानाजी गुरव, सचिन उंचावळे, संगीता देऊस्कर,जयश्री जाधव,शंकर कांबळे, संजय कांबळे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.
 


आमदारकीची एक संधी द्या,आंबेओहोळच्या पुनर्वसनचा प्रश्न पहिल्याच बैठकीत मार्गी लावतो -समरजितसिंह घाटगे