बातम्या

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Government is committed for all


By nisha patil - 7/17/2024 10:41:27 PM
Share This News:



आषाढी एकादशी निमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूर तीर्थ क्षेत्र  सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

        पंढरपुरातील भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार भरत गोगावले, समाधान आवताडे,  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर आदी उपस्थित होते.

        मुख्यमंत्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, एक रुपयात शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, साडे सात हॉर्स पॉवर पंपासाठी मोफत वीज, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 सिलेंडर मोफत, मुलींना मोफत शिक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कर्ज योजना, बेरोजगार तरुणांना  12 वी नंतर 6 हजार, डिप्लोमा नंतर 8 हजार व पदवीधर साठी 10 हजार प्रशिक्षण भत्ता आदी योजना राबविल्या जात आहेत.

        राज्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने आतापर्यंत 7 हजार 200 कोटी रुपये अदा केले आहेत. वयोश्री योजनेअंतर्गत वृद्ध व्यक्तीसाठी 3 हजार रुपये देण्यात येत आहेत. एकूणच शासन शेतकरी, कामगार, कष्टकरी, वारकरी अशा सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे असून त्यांच्यासाठी  शासन अनेक महत्वपूर्ण योजना राबवित आहे.

        राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनासाठी शासनाने 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासाठी आणखीन 10 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. निधीची कमतरता भासू देणार नाही. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालून शासन सर्व घटकांसाठी काम करत आहे. आषाढी वारी नंतर पंढरपूर शहर स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर ठेवून वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरक्षित करावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.


तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे