बातम्या
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेची भव्य शोभायात्रा
By nisha patil - 6/26/2024 11:25:52 PM
Share This News:
कोल्हापूर: दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतील विविध चित्रधाथातून व विविध सजीव देखाव्यातून शाहू महाराजांच्या विचाराचा व कार्याचा जागर करण्यात आला.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे (दादा), कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे व इतर सर्व शाखांचे प्रमुख यांनी श्रीफळ वाढवून या शोभायात्रेची सुरुवात दसरा चौकातून केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व इतर मान्यवरांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदवला.
संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांनी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या परिसरातील छत्रपती शाहू महाराज तसेच माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या अर्ध पुतळ्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ही शोभायात्रा पुढे राजाराम चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक, महानगरपालिका,सीपीआर मार्गे श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आली. तेथे या यात्रेचा समारोप करण्यात आला. शोभा यात्रेच्या मार्गावरील सर्व थोर विभूतींना व समाज सुधारकांना पुष्पर अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, राजर्षी शाहू महाराज फार्मसी कॉलेज, वेणूताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ,राजर्षी शाहू आयटीआय, साई हायस्कूल व जुनिअर कॉलेज,जव्हार नगर हायस्कूल, श्रीपतराव बोंद्रे दादा इंग्लिश मीडियम स्कूल,शंकरराव बोंद्रे बाल मंदिर संकुल या व इतर शाखांच्या वतीने जलसाक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, खासबाग कुस्ती मैदान, औषध निर्माण, उद्योग कार्यशाळा, आरोग्य व्यवस्था यावरील सजीव देखावे सादर करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज व इतर इतर समाजसुधारकांच्या वेशभूषा केल्या होत्या. सर्व विभागाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, सेवक, विद्यार्थी तसेच एन एस एस,एन सी सी चे स्वयंसेवक यांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदवला. छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत .या कार्यक्रमांची माहिती शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी यावेळी दिली. विविध व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, शाहू महाराजांच्या वरील विविध पुस्तकांवर चर्चा, संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय कार्यशाळा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, हेरिटेज वॉक, शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या विविध कार्य स्थळांना अभ्यास भेटी या व इतर उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. वर्षभर या कार्यक्रमातून शाहू महाराजांच्या विचारांचा जागर होणार आहे . या शोभायात्रेचे संयोजन प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच संस्थेचे अधीक्षक श्री रुपेश खांडेकर व त्यांच्या सहकार्यानी केले. डॉ पांडुरंग पाटील यांनी सर्वांचे आभार मानले .
श्री शाहू छत्रपती श्री शाहू शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतही छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल आंबले, श्री मनीष भोसले, डॉ प्रशांत पाटील यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. पतसंस्थेचे सर्व संचालक, पतसंस्था कर्मचारी श्री भंडारी, श्री थोरबोले, श्री धावारे यावेळी उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेची भव्य शोभायात्रा
|