बातम्या
शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना" संकल्पनेचे उद्घाटन
By nisha patil - 2/19/2025 9:57:55 PM
Share This News:
शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना" संकल्पनेचे उद्घाटन
कोल्हापूर : शहरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना" या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला, मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळणार आहे.
प्रमुख पाहुण्या कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले की, "या संकल्पनेच्या माध्यमातून घराघरातील छोटे-मोठे वाद मिटविण्यास मदत होईल. समाजात सलोखा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा ठरेल."
प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांनी यावेळी सांगितले की, "आरोग्य सेवेच्या धर्तीवर कायद्याच्या दवाखान्याची संकल्पना राबवण्यात आली आहे. आरोग्य शिबिरांप्रमाणेच लोकांना कायदेशीर वाद आणि तंट्यांवर मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे. फिरत्या कायद्याच्या दवाखान्याच्या माध्यमातून विविध चौकांमध्ये नागरिकांना कायदेशीर माहिती उपलब्ध करून देण्याची योजना आहे."
या उपक्रमांतर्गत महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजूंसाठी विशेष सहाय्य दिले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यास कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना" संकल्पनेचे उद्घाटन
|