आरोग्य

थंडीच्या दिवसांत पचनशक्तीत बिघडली?

Indigestion during cold days


By Administrator - 1/15/2025 4:52:28 PM
Share This News:



दिवसेंदिवस वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेकांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्यांना वरचेवर तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये बहुतांश लोकांना अपचनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात नैसर्गिकरित्या आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात खातो. असे उष्ण पदार्थ पचायला वेळ लागतो, त्यामुळे कधी कधी पोटांत बिघाड होतो. हिवाळ्यात अन्नाचे पचन चांगले होते या समजुतीखाली नानाविविध पदार्थांवर ताव मारला जातो आणि त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. उन्हाळ्यात आपण जास्त चालतो. मात्र हिवाळ्यात प्रचंड थंडी असल्याने फारसे घराबाहेर पडत नाहीत, यामुळे हिवाळ्यात पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. पचन क्रिया व्यवस्थित नसेल तर कशाचीही चव चांगली लागत नाही

खाल्लेल्या पदार्थांचे नीट पचन न झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची कमतरता भासते. आपले शरीर पचन संस्थेवर आणि पचन क्रियेवर अवलंबून असते. निरोगी पचनसंस्था असलेल्या व्यक्तीचे शरीर निरोगी व सुदृढ असते. यासाठीच हिवाळ्याच्या दिवसांत जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये थोडासा बदल करून काही आरोग्यदायी सवयीं लावल्या तर पचनक्रिया सुरळीत राहते. या आरोग्यदायी सवयी कोणत्या ते पाहूयात.

हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फॉलो करा ५ सवयी...

१. कोमट पाणी प्या... हिवाळ्यात, सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम कोमट पाणी प्यावे. त्यामुळे मालत्याग होऊन पोट साफ होण्यास अधिक मदत मिळते. रिकाम्या पोटी आधी कोमट पाणी प्यायल्यास ते संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरते. कोमट पाणी प्यायल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

२. हर्बल टी प्या...
हिवाळ्यात, सकाळी उठल्यानंतर हर्बल टी जरुर प्यावा. जर तुम्ही दालचिनीचा चहा, ग्रीन टी किंवा इतर कोणताही हर्बल टी रिकाम्या पोटी प्यायला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला होतात. त्यामुळे कोमट पाणी प्यायल्यानंतर सगळयात आधी हर्बल टी प्या. यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहण्यासही मदत होते शिवाय हर्बल टी प्यायल्याने पचनक्रियाही सुरळीत चालते. 

३. आहारात फायबर आणि प्रोटिन्स घ्या...
 हिवाळ्यात नाश्ता किंवा जेवणात फायबर आणि प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा अधिक जास्त समावेश करावा. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी डाएटमध्ये प्रोटिन्स आणि फायबर दोन्ही घेणे आवश्यक आहे. प्रोटीन घेतल्याने तुम्हाला दिवसभरात पुन्हा पुन्हा भूक लागणार नाही. याव्यतिरिक्त, फायबर सूज येणे आणि आम्लता प्रतिबंधित करते.

४. हेव्ही नाश्ता करणे टाळा... 
हिवाळ्यात बहुतेकजण वारंवार भूक लागते म्हणून हेव्ही नाश्ता करतात. परंतु हे चुकीचे आहे. जर तुमची पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर तुम्ही हेव्ही नाश्ता करणे टाळावे. नाश्त्यात जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका. कारण यामुळे तुम्हाला दिवसभर ॲसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या सतावू  शकते. 

५. वॉकिंग किंवा एक्सरसाइज करा...
हिवाळ्यात बरेचदा वातावरणातील गारठ्यामुळे आपण बाहेर वॉकिंग किंवा एक्सरसाइज करण्यासाठी जाणे टाळतो. परंतु असे न करता दिवसांतून किमान ३० मिनिटे वॉकिंग किंवा एक्सरसाइज करावा. यामुळे ॲसिडिटी आणि ब्लोटिंग सारख्या समस्या दूर होतील. याशिवाय शरीरात ऊर्जाही टिकून राहते.


थंडीच्या दिवसांत पचनशक्तीत बिघडली?
Total Views: 115