बातम्या

जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन आयोजित झिम्मा फुगडीस उत्स्फूर्त प्रतिसाद

Jayshri jadhav


By nisha patil - 9/30/2024 11:48:37 PM
Share This News:



झिम्मा-फुगडीने धरलेले रिंगण अन् फु बाई फुऽऽ चा घुमणारा आवाज अशा उत्साही वातावरणात आणि नटूनथटून, विविध आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या महिला व मुली झिम्मा-फुगडी, काटवटकणा, उखाणे, छुई-फुई, घागर घुमवणे, सूप नाचवणे अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळामध्ये दंग झाल्या होत्या. निमित्त होते जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित झिम्मा फुगडी कार्यक्रम व स्पर्धेचे. या कार्यक्रमात सहभागी महिलांनी मराठमोळ्या संस्कृतीचे व स्त्रीशक्तीचे दर्शन घडवले. स्पर्धेत पंडेवाडी (ता.राधानगरी) येथील धनलक्ष्मी झिम्मा फुगडी संघ प्रथम क्रमांक पटकावला. 

 

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, मराठमोळ्या संस्कृतीची परंपरा जोपासताना महिलांच्या पारंपारिक खेळांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या या कार्यक्रमात सहभागी महिलांनी आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवले. आपल्या संस्कृतीचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम या उपक्रमातून होत आहे.

 

महिलांना स्वयंरोजगारातुन स्वाभिमानाकडे नेण्यासाठी, घे भरारी हे ब्रीद वाक्य निश्चित करून जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन काम करीत आहे. वर्षभर विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात येत आहे. प्रत्येक महिलेला स्वतः साठी वेळ देऊन मनमुराद जगण्याचा आनंद मिळावा या उद्देशाने स्पर्धेच्या पलीकडे जाऊन फाउंडेशनच्या वतीने झिम्मा फुगडी कार्यक्रमाचे आयोजन केले. पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव, डौ. काजल सावंत, सुनिता सावंत यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता जाधव, कोल्हापूर बुद्धम सोसायटीच्या संचालिका संगीता नलवडे यांच्या हस्ते झाले. 

 

झिम्मा, उखाणे, फुगडी, घोडा-घोडा, काटवट कणा, पारंपारिक वेशभूषा रॅम्प वॉक या सर्व विविध स्पॉट गेम मध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आकर्षक बक्षीस जिंकली. झिम्मा फुगडी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : धनलक्ष्मी झिम्मा फुगडी संघ, बीजीएम महिला मंडळ - शिवाजी पेठ, ताराराणी ग्रुप- बुधवार पेठ, संयुक्त धनगर गल्ली ग्रुप- कसबा बावडा, यशस्विनी ग्रुप कदमवाडी.

 

यावेळी वैभवी जरग, सुमन ढेरे, उज्वला चौगुले, अंजली जाधव, पद्मिनी माने, वैशाली महाडिक, सरिता सासणे, जयश्री पाटील, मंगल खुडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. साहिल भारती यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली.


जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन आयोजित झिम्मा फुगडीस उत्स्फूर्त प्रतिसाद