विशेष बातम्या
कोल्हापूरच्या लेकीचा पुण्यात डंका : महिलांनी अनुभवला ऍडव्हेंचर बाईकचा थरार
By nisha patil - 4/3/2025 10:06:37 PM
Share This News:
कोल्हापूरच्या लेकीचा पुण्यात डंका : महिलांनी अनुभवला ऍडव्हेंचर बाईकचा थरार
पुणे : तरुणींच्या ‘बकेटलिस्ट’मध्ये असणारा ऍडव्हेंचर बाईकचा थरार प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मिळाली, ती शुभांगी सावंत यांच्या पुढाकारामुळे. महिला दिनानिमित्त शुभांगी इंडस्ट्रीच्या वतीने पुण्यातील लोहगाव येथे भव्य ऍडव्हेंचर बाईक राईडचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमात २०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला, तर देशभरातून ४० हून अधिक बाईकर्स या सोहळ्याला उपस्थित होते.
महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय
शुभांगी सावंत यांनी महिलांच्या आत्मविश्वास आणि उत्साहवृद्धीसाठी हा आगळावेगळा उपक्रम राबवला. या उपक्रमात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पोर्ट्स बाईक्सचे प्रदर्शन भरवण्यात आले. इंडोनेशिया, मुंबई, जयपूर यासह विविध शहरांतील बाईकर्स यात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश मुंद्रा, डॉ. राजेंद्र शिंपी, मोटोपार्क १९९चे रुपेश चोंधे यांसारखी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर ते पुणे : शुभांगी सावंत यांचा प्रवास
मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या शुभांगी सावंत या बाल मानसोपचारतज्ज्ञ असून, सुमारे १५ वर्षांपूर्वी त्या पुण्यात स्थायिक झाल्या. पुण्यातील लोहगाव भागातील महिलांची आर्थिक परिस्थिती आणि रोजगाराच्या संधींचा अभाव पाहून त्यांनी ‘शुभांगी इंडस्ट्री’ सुरू केली.
या उद्योगात घरगुती मसाले आणि स्वच्छता उत्पादने तयार केली जातात. स्थानिक महिलांना प्रशिक्षण देऊन आर्थिक सक्षम करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. तसेच महिला बचत गट स्थापन करून अर्थसाक्षरतेचा प्रसार केला.
महिला आणि ऍडव्हेंचर बाईक्स
महिलांना धकाधकीच्या आयुष्यातील तणावातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांची ‘बकेटलिस्ट’ पूर्ण करण्यासाठी शुभांगी सावंत यांनी ऍडव्हेंचर बाईक राईडचे आयोजन केले.
या उपक्रमात गृहिणींनी बाईक रायडर तरुणींशी संवाद साधला, तसेच विना-गियर दुचाकी चालविणाऱ्या महिलांनी ऍडव्हेंचर बाईक चालवण्याचे धडे गिरवले.
बकेटलिस्ट पूर्ण करण्याचे स्वप्न
या अनोख्या अनुभवातून लेह-लडाखसारख्या दुर्गम भागांत बाईक राईड करण्याच्या स्वप्नाला नवे पंख लाभले. अनेक महिलांनी थंड हवामान, उंच पर्वत, वाळवंट, अपुरा ऑक्सिजन आणि निसरड्या मार्गावर बाईक राईड करण्याच्या आव्हानांबाबत माहिती घेतली.
➡️ महिलांना नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास देणाऱ्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी शुभांगी सावंत यांचे विशेष कौतुक होत आहे.
कोल्हापूरच्या लेकीचा पुण्यात डंका : महिलांनी अनुभवला ऍडव्हेंचर बाईकचा थरार
|