बातम्या
महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची व यंत्रणा स्वच्छतेची कामे सुरु
By nisha patil - 11/9/2024 11:38:47 PM
Share This News:
जिल्ह्यात पावसामुळे महावितरणच्या वीज यंत्रणे जवळ गवत, वेली, झुडपे, झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही वेळा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित होत होता. ही बाब लक्षात घेत कोल्हापूर मंडल कार्यालयाकडून जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ०१ सप्टेंबर रोजी सुरु झालेली ही देखभाल दुरुस्तीची मोहीम अद्याप सुरु असून आज अखेर जिल्ह्यात ५९०२ ठिकाणी स्पेसर्स बसविले, २७०३ ठिकाणी गरजेनुसार वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली, १३८९ ठिकाणी वीज यंत्रणेवरील वेली काढल्या तर ४०३ ठिकाणी खाली आलेल्या वीज वाहिन्यांचा ताण काढून त्यांना योग्य उंचीवर घेण्यात आले आहे.
महावितरणच्या या मोहिमेमुळे पावसाळ्यात वीज यंत्रणेच्या जवळ वाढलेल्या गवत, वेली, झुडपे, झाडे यांच्यापासून वीज यंत्रणेने मोकळा श्वास घेतला असून ग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. वीज वाहिन्या जवळील वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केल्याने वादळ वाऱ्यात फांद्या तुटून वीज वाहिन्यांवर पडण्याचे प्रमाण कमी होणार आहे, मोठ्या प्रमाणात स्पेसर्स बसवल्याने वीज वाहिन्या तुटून होणाऱ्या दुर्घटनेचे प्रमाण कमी होणार आहे तसेच व्होल्टेज गुणवत्तेत ही सुधारणा होणार आहे.
*देखभाल दुरुस्तीची व स्वच्छतेची मोहीम सुरूच राहणार – गणपत लटपटे*
वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने सद्या सुरु केलेली वीज यंत्रणा देखभाल दुरुस्तीची व स्वच्छतेची मोहीम सुरूच राहणार आहे. ग्राहकांनी यंत्रणेबाबतची तक्रार नोंदवल्यास त्यास प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश कर्मचार्यांना दिले आहेत, असे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी सांगितले आहे.
*वॉट्सॲपवर करा तक्रार*
वीज यंत्रणेबाबत ग्राहकांना कोणतीही तक्रार करायची असल्यास ते महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1912 / 1800-212-3435 / 1800-233-3435 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहक 7875769103 या क्रमांकाच्या वॉट्सअँप वर संपर्क साधू शकतात.
*कर्मचाऱ्यांकडून उत्तम सेवा व ग्राहकांकडून सहकार्य*
महावितरणचे कर्मचारी ऊन, वादळ वारा पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यास कार्यरत असतो. या पावसाळ्यात ही वीज कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रसंगी पुराच्या पाण्यात उतरून, धोका पत्करून काम केले आहे. पावसामुळे वीज यंत्रणा दुरुस्तीच्या कामास काही ठिकाणी वेळ लागला तेथे ग्राहकांनीही महावितरणला मोलाचे सहकार्य केले आहे.
महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची व यंत्रणा स्वच्छतेची कामे सुरु
|