बातम्या
आई-मुलाच्या नात्याला काळीमा: पुण्यात नवजात बालकाला रस्त्यावर टाकले, पोलिसांचा तपास सुरू
By nisha patil - 10/12/2024 6:19:28 PM
Share This News:
आई-मुलाच्या नात्याला काळीमा: पुण्यात नवजात बालकाला रस्त्यावर टाकले, पोलिसांचा तपास सुरू
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमध्ये समाजमन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका निर्दयी आईने नवजात बालकाला जन्म देऊन रस्त्यावर टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेषतः या बाळाच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
सोमवारी रात्री बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी सिंहगड पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी तातडीने बालकाला ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिंहगड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, नवजात बाळाच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. हे कृत्य अनैतिक संबंधांमुळे घडले का, याचाही तपास सुरू आहे. परिसरातील रुग्णालयांमध्ये नुकत्याच झालेल्या प्रसूतींची चौकशी करण्यात येत आहे.
ही घटना आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी असून, समाजाला धक्का देणारी ठरली आहे.
आई-मुलाच्या नात्याला काळीमा: पुण्यात नवजात बालकाला रस्त्यावर टाकले, पोलिसांचा तपास सुरू
|