राजकीय
मुश्रीफसाहेब, मागच्या दाराने पळून गेला म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केल्याचे सिद्धच केले -समरजितसिंह घाटगे
By nisha patil - 12/11/2024 8:37:46 PM
Share This News:
मुश्रीफसाहेब, मागच्या दाराने पळून गेला म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केल्याचे सिद्धच केले
समरजितसिंह घाटगे
कागलमध्ये कोपरा सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद
मोडक्या स्कूटरवरून फिरणाऱ्या पालकमंत्र्यांकडे कोट्यावधींची माया आली कुठून?
कागल,प्रतिनिधी. पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या घरावरील ईडीच्या धाडीवेळी नागरिक त्यांच्या दारासमोर या अधिकाऱ्यांच्या समोर समर्थनात उभे राहिले होते. मात्र पालकमंत्र्यांनी पाठीमागच्या दाराने पळून गेले. याचाच अर्थ त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे स्वतःच सिद्ध केले. अशी घणाघाती टीका महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केली.
कागल शहरातील विक्रमनगर,शाहूनगर,नेताजी सुभाषचंद्र बोस चौक व मुजावर गल्ली या ठिकाणी झालेल्या कोपरा सभांवेळी ते बोलत होते. यावेळी आनंदा माणगावकर, रोहित माणगावकर, देवदास मोरे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
घाटगे पुढे म्हणाले,छत्रपती शाहू महाराजांची जनक भूमी असलेल्या कागलची ओळख पालकमंत्र्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे चुकीची निर्माण झाली आहे. कागल गडहिंग्लज उत्तूर विभागामध्ये शाश्वत काम तर नाहीच शिवाय नियोजनबद्ध काम केलेले नाही.रस्ते गटर्स व प्लॉटिंग करणारे कार्यकर्त्यांचे संरक्षण, यामध्येच त्यांनी विशेष लक्ष घातले. कागलसारख्या शहरात वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेल्या पालकमंत्र्यांना 500 बेडचे हॉस्पिटल आणले नाही?. सुदृढ व स्वावलंबी पिढी घडवण्याऐवजी त्यांना बिघडवीण्याचे काम पाकीट संस्कृतीतून त्यांनी केले आहे. यापुढे जाऊन त्यांच्या गल्लीत गांजा पकडला जातो. हे छत्रपती शाहू महाराजांच्या कागलचे मोठे दुर्दैव आहे. छत्रपती शाहू महाराजांचे आदर्श कागल घडविण्यासाठी गट तट जात पात सगळे बाजूला ठेवून एकत्र येऊन बदल घडवूया.
मोडक्या स्कूटरवरून फिरणाऱ्या पालकमंत्र्यांकडे कोट्यावधींची माया आली कुठून?
राजेंद्र जाधव म्हणाले 40 वर्षांपूर्वी पालकमंत्री वाय डी माने यांच्या लंब्रेडा स्कूटरवरून फिरायचे. त्यांच्याकडे स्वतःची गाडीही नव्हती. मात्र आज त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची माया असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखवले आहे. आत्ता त्यांचेकडे हजारो कोटी रुपयांची मालमत्ता आली कुठून? याशिवाय त्यांचे नातेवाईकांच्या नावावर असलेली हजारो कोटी रुपयांची मालमत्ता आहे हे गोड बंगाल काय ? स्वर्गीय राजे गटाचे माजी नगरसेवक सुभाष कालेकर यांचे उदाहरण देताना श्री जाधव म्हणाले 25 वर्ष पाहतो कालेकर आहे तसेच आहेत, प्रामाणिकपणे कष्ट करून खातात. उलट मुश्रीफ साहेब यांचे आठ दहा वर्षांपूर्वी झालेले नगरसेवक पाहिले तर काय ते बंगले? काय त्या गाड्या? काय त्यांचा रुबाब? काय ती त्यांची प्रॉपर्टी अस म्हणण्याची वेळ आली आहे
मुश्रीफ साहेब यांचा डायमंड कॉन्ट्रॅक्टर
रमीज मुजावर म्हणाले, मुश्रीफ साहेबांनी ज्या चार ठेकेदारांना मोठे केले त्यामधील एक कागल शहरातील असून तो डायमंड कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळखला जातो.शहरातील संपूर्ण कामांचे नियोजन तो करतो.मग मुश्रीफ साहेब यांच्या इतर कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे लावायचे सतरंज्या उचलायचेच काम करायचे का ? मुस्लिम बांधवानो ही निवडणूक विचाराची आहे. आम्हा मुस्लिम बांधवांसाठी मुश्रीफ साहेबांनी काय केले हे जरा तपासा. मुश्रीफ साहेब यांनी 25 वर्षात मुस्लिम बांधवांसाठी न केलेल्या कामाचा पाढाच श्री मुजावर यांनी सभेत वाचला
शाहूंचे नाव घेता मग त्यांचा वंशज का चालत नाही?
माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असलेले समरजितसिंह घाटगे सीए सारखे उच्चशिक्षित आहेत.शाहू ग्रुपची धुरा त्यांनी यशस्वी सांभाळली आहे. या विभागाच्या शाश्वत विकासासाठी ते रात्रंदिवस झटत आहेत. शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या विरोधकांना शाहूंचा हा वंशज आमदार म्हणून का चालत नाही?
यावेळी अखिलेशराजे घाटगे, कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, सुरेश कुराडे, शिवानंद माळी, सागर कोंडेकर,हौसाबाई धुळे, दादू गुरव,दगडू चौगुले, दिलीप पाटील,प्रमोद हर्षवर्धन, संकेत भोसले,हिदायत नायकवडी, गजानन माने,विजया निंबाळकर,अभिजीत कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कोपरासभांना राजे वीरेंद्रसिंह घाटगे,बाॕबी माने,सतीश पाटील,नंदू माळकर,आनंदा पसारे,आनंदी मोकाशी,दिपाली भुरले,विवेक कुलकर्णी,दीपक मगर,उमेश सावंत,नम्रता कुलकर्णी,दीपाली घोरपडे,विद्या गिरी आदी उपस्थित होते.
मुश्रीफसाहेब, मागच्या दाराने पळून गेला म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केल्याचे सिद्धच केले -समरजितसिंह घाटगे
|