बातम्या

पंचगंगा पात्रा, बाहेर 50 बंधारे पाण्याखाली Panchganga basin, outside 50 dams under water

Panchganga basin outside 50 dams under water


By nisha patil - 8/7/2024 11:46:08 AM
Share This News:



शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने रविवारी सकाळी यावर्षी प्रथमच पंचगंगा पात्राबाहेर पडली.गेल्या २४ तासांत तुळशी, कुंभी, पाटगाव, चित्री, जंगमहट्टी, जांबरे, सर्फनाल, कोदे या धरण क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी झाली. घटप्रभा येथे २०० मि.मी. पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील ५० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहरात सुरू असलेल्या पावसामुळे रात्री ८ च्या सुमारास वाय. पी. पोवारनगरकडून हुतात्मा पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर मोठे झाड उन्मळून पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी तालुक्यातील राशिवडे व मोहडे येथे घरावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. मोहडे येथे चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या तर राशिवडे येथे बाळू दगडू जोग यांच्या घरावर कोसळली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोल्हापुरात शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. रविवारी सकाळी हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट दिला.त्यानंतर दिवसभर शहरासह जिल्ह्यात संततधार सुरू होती. पावसाच्या दमदार हजेरीमुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. शनिवारी रात्री ९ वाजता २६.५ फुटांवर असणारी पंचगंगेची पातळी रविवारी दुपारी २ वाजता २८.१० फुटांवर पोहोचली होती. पाणी पंचगंगा विहार मंडळाच्या बाजूने बाहेर पडले. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सायंकाळपर्यंत विहार मंडळाकडे जाणाऱ्या मार्गासह घाटावर पाणी आले. रात्री १२ वाजता पाणी पातळी ३० फूट ०९ इंचावर पोहोचली. सोमवारीही मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शहरात दिवसभर पावसाचा जोर होता. यामुळे सखल भागात पाणी साठले. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांची तारांबळ उडाली होती. २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी २१.७ मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात (७१.३ मि.मी.) झाला. त्यानंतर चंदगड तालुक्यात ५५.१ मि. मी. पाऊस झाला आहे. राधानगरी धरणात ३.४ टीएमसी पाणीसाठा असून धरणातून १२५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
 


पंचगंगा पात्रा, बाहेर 50 बंधारे पाण्याखाली