बातम्या
राजकीय पक्ष, उमेदवारांनी जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करून घ्यावे – जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 10/25/2024 2:58:42 PM
Share This News:
कोल्हापूर, : आदर्श आचारसंहितेच्या योग्य अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने राजकीय प्रचारातील प्रत्येक इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सोशल मीडियातील पेड जाहिरात, सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या एलईडी फलकावरील मजकूर, टीव्ही, रेडिओ, व्हाईस मेसेज, बल्क एसएमएस मधील मजकूर यासह इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना केले आहे. हे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज प्रसिद्धी दिनांकच्या तीन दिवस अगोदर जिल्हास्तरावर माध्यम कक्षात सादर करावा. या अर्जांवर मंजूरी देण्यासाठी व अर्ज पडताळणी करण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. आत्तापर्यंत तीनवेळा राजकीय पक्ष, उमेदवारांच्या कार्यशाळेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. माध्यम कक्ष हा जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहाच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर कार्यरत असून 0231 2992920 या दूरध्वनी क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण, पेड न्यूज तसेच फेक न्यूजबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) तसेच नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्या सनियंत्रणाखाली माध्यम कक्ष स्थापना करण्यात आला आहे. निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष यांनी समाज माध्यमांवर निवडणूक प्रचारासंबंधित जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत सादर करावा असे आवाहन मीडिया सेंटरचे नोडल अधिकारी सचिन अडसूळ यांनी केले आहे. स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्या माध्यमातून ही समिती मुद्रित, दृकश्राव्य व सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या पेड, फेक न्यूज, द्वेष व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट, बातम्यांवर बारीक नजर ठेवत आहे. तसेच राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांना समाज माध्यमांवर निवडणूक प्रचारासंबंधित जाहिरातींचे प्रमाणीकरण करून देण्याचे कार्य सुद्धा ही समिती करणार आहे. निवडणुकीचा काळ असल्यामुळे आदर्श आचारसहिंता लागू झालेली असून याचा कुठेही भंग होणार नाही यासाठी हा कक्ष गंभीरपणे काम करीत आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघासाठी राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण तसेच सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी मीडिया कक्षाची स्थापना केलेली असून सक्षम अधिकाऱ्यांसह सोबत आवश्यक तज्ज्ञ व्यक्तींची, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. राजकीय पक्षास किंवा उमेदवारास आदर्श आचार संहितेत नमूद केल्यानुसार सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जाहिरात प्रसारित करून निवडणुकीचा प्रचार करावयाचा असल्यास त्यांनी त्या आधी मीडिया कक्षातील माध्यम समितीकडून सदरच्या जाहिराती पूर्व-प्रमाणित (प्री-सर्टिफाय) करून घेणे आवश्यक आहे. जाहिराती पूर्व प्रमाणित करून घेताना जाहिरातीचा मजकूर संहिता, ऑडिओ, व्हिडीओ असल्यास तो पेन ड्राइव्ह मध्ये, जाहिरात देण्याचे कारण, जाहिराती निर्माण करण्यास तसेच प्रसारित करण्यास येणारा खर्च विहित नमुन्यातील अर्जासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षाकडे सादर करावा. या अर्जाच्या अनुषंगाने प्रमाणित झालेल्या जाहिरातीस मान्यता प्रमाणपत्र देण्यात येईल. पूर्व-प्रमाणित न केलेल्या जाहिराती प्रसारित करून प्रचारासाठी वापरल्यास सर्व संबंधितांच्या विरोधात आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते.
या कक्षाचे पेड न्यूजवर सुद्धा विशेष लक्ष असणार आहे. निवडणुकीच्या काळात प्रत्येक राजकीय हालचालींसह सायबर सेलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत सोशल मीडियाशी संबंधित सर्व प्लॅटफॉर्मवर उमेदवार, त्यांचा प्रचार करणारे सहकारी, सोशल मीडिया इन्फ्लूएंजर तसेच पक्षांशी संबंधित खात्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने समाजमाध्यमांवर वांशिक, धार्मिक किंवा जातीविषयक पोस्टद्वारे सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या, नागरिकात निवडणूक प्रक्रिये संदर्भात निवडणुकीत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन संभ्रम निर्माण करणाऱ्या तसेच हिंसा, फेक मेसेज, मॉर्फ केलेले फोटो, ऑडिओ, व्हिडिओ, एसएमएस निर्माण करणे किंवा शहानिशा न करता अशा पोस्ट शेअर करणाऱ्यांवर मीडिया कक्षाची करडी नजर असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांना अशी माहिती अढळल्यास या कक्षास किंवा सी-व्हीजील ॲपवर तक्रार दाखल करता येणार आहे.
वृत्तपत्रांमध्ये फक्त मतदानादिवशी व एक दिवस आधीच्या म्हणजेच दि.19 व 20 नोव्हेंबरच्या वृत्तपत्रात राजकीय जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास त्याला पूर्व प्रमाणीकरण करून घेण्याची गरज आहे. तसेच यासाठी प्रसिद्धी दिनांकच्या दोन दिवस आधी अर्ज सादर करावा लागेल. इतरवेळी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींना पूर्व प्रमाणीकरणाची गरज नाही.
"बदलत्या काळानुसार प्रचाराचे स्वरूप बदलत आहे. सामाजिक माध्यमे यात फेसबुक आणि इन्स्टाग्राम वरती मोठ्या प्रमाणात राजकीय जाहिराती पाहायला मिळतात. या माध्यमांवर राजकीय पोस्ट करून त्यासाठी पैसे खर्च करून ती बूस्ट केली जाते. म्हणजेच ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावर आदर्श आचारसंहिता उल्लंघनाबाबत मिडिया कक्षातील सायबर टीम लक्ष ठेवून आहे. या जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच तो खर्च संबंधित पक्ष किंवा उमेदवाराच्या खर्चात पकडला जातो". – सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी, माध्यम कक्ष.
राजकीय पक्ष, उमेदवारांनी जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करून घ्यावे – जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे
|