बातम्या

प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे भाजपमध्ये दाखल...

Prakash Awade and Rahul Awade join BJP


By nisha patil - 9/25/2024 8:17:28 PM
Share This News:



महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीने राजकीय वर्तुळात चांगलीच हालचाल सुरू झाली आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातूनही महायुतीतील इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात महायुतीच्या जागावाटपात भाजपचा दावा असून, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्यात उमेदवारीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे हे बुधवारी (२५ सप्टेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची भाजप प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आवाडेंच्या प्रवेशामुळे भाजपला इचलकरंजीत मोठे बळ मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर करून शिवसेना शिंदे गट आणि भाजपला थेट आव्हान दिले होते. परंतु, महायुतीच्या वरिष्ठांनी त्यांची मनधरणी करत विधानसभेचा शब्द दिला होता. आता भाजपने आवाडेंना पक्षात सामील करून घेत विधानसभेतील स्पर्धेत त्यांना अग्रस्थान दिले आहे.

प्रकाश आवाडे यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसशी निष्ठावान राहिली आहे. त्यांच्या वडिलांनीही काँग्रेसचे खासदार म्हणून मोठे कार्य केले आहे. मात्र, २०१९ मध्ये प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यानंतर भाजपसोबत काम करत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उमेदवारीबाबत मात्र सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे. आवाडे पिता-पुत्र भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने हाळवणकर कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे भाजपमध्ये दाखल...