विशेष बातम्या
कायद्याची माहिती होण्यासाठी जनजागृती आवश्यक - न्यायाधीश एस. एस. इंगळे
By nisha patil - 6/3/2025 7:15:08 PM
Share This News:
कायद्याची माहिती होण्यासाठी जनजागृती आवश्यक - न्यायाधीश एस. एस. इंगळे
गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटना हा देशाचा प्रमुख दस्तऐवज असून, त्यानुसार प्राप्त अधिकारांची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांना कायद्याची माहिती होण्यासाठी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. इंगळे यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव येथे कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख आणि ॲड. विजयकुमार कदम प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी न्यायाधीश इंगळे यांनी 'मनोधैर्य योजना' आणि 'पीडित भरपाई योजना' याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांसह महिलांच्या हक्क व सुरक्षेसाठी असलेल्या विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले.
महिला आणि बालसंरक्षण कायद्यांवर मार्गदर्शन
ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक प्राचार्य के. डी. पाटील होते. यावेळी प्राचार्य तेजस पाटील, मुख्याध्यापिका एस. के. पाटील, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस. के. पाटील यांनी केले, सूत्रसंचालन उपप्राचार्य निर्मला केसरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. विजयकुमार कदम यांनी मानले.
कायद्याची माहिती होण्यासाठी जनजागृती आवश्यक - न्यायाधीश एस. एस. इंगळे
|