बातम्या

विद्युत अपघातामुळे होणाऱ्या जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी घरोघरी आरसीसीबी हवा - अधीक्षक अभियंता गांगुर्डे

RCCBs are required in every household to prevent life and financial loss due to electrical accidents


By nisha patil - 2/7/2024 1:32:46 PM
Share This News:



विद्युत अपघातामुळे घडणाऱ्या जिवीत व वित्तहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी "संकल्प नवा विद्युत सुरक्षेकरीता घरोघरी आरसीसीबी (RCCB) हवा" हा नारा जनतेमध्ये रुजवुया आणि तो पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करुया, असे आवाहन करुन कुटूंबियांच्या सुरक्षेसाठी आरसीसीबीचे महत्व ओळखून आजच आपल्या वीज संच मांडणीमध्ये आरसीसीबी जोडणी करुन घेवुया, असे प्रतिपादन पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता हे. ना. गांगुर्डे यांनी केले.

 

राष्ट्रीय सुरक्षा परिषद, मुंबई व केंद्रीय विद्युत प्राधिकरण भारत सरकार यांनी घोषीत केल्यानुसार पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळांतर्गत विद्युत निरीक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी व विद्युत ठेकेदार यांच्या संयुक्त विद्यमाने 2 जुलै 2024 पर्यंत राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह 2024 साजरा करण्यात येत आहे. यावेळी विद्युत सुरक्षेबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने कार्यक्षेत्रामध्ये पदयात्रा, शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्युत सुरक्षा विषयी परिसंवाद, तांत्रिक कर्मचारी, तांत्रिक कामे करणारे कारागीर यांना विद्युत सुरक्षेचे महत्व विषद करुन संचमांडणीवर काम करतेवेळी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन, असे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. संचमांडणीवर काम करतेवेळी विद्युत अपघात हे विद्युत सुरक्षेबाबत निष्काळजीपणा किंवा अज्ञान यामुळे घडत असल्याचे दिसून येते व त्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागतो तसेच अर्थिक नुकसान होते. याकरीता समाजामध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. मंडळांतर्गत येणारे विद्युत निरीक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व विद्युत ठेकेदार हे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह २०२४ यशस्वी करतील व त्याचा फायदा जनतेला निश्चित फायदा होईल, असा विश्वास विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.


विद्युत अपघातामुळे होणाऱ्या जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी घरोघरी आरसीसीबी हवा - अधीक्षक अभियंता गांगुर्डे