बातम्या
राजर्षी शाहू महाराजांचे आपत्ती विषयक धोरण आजही देशाला दिशादर्शक; डॉ.सुरेश शिखरे
By nisha patil - 10/16/2024 10:26:53 PM
Share This News:
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात सव्वाशे वर्षांपूर्वी राबवलेले प्लेग च्या साथीतील आणि दुष्काळ निवारणातील आपत्ती व्यवस्थापन आजही देशाला दिशादर्शक असे आहे असे प्रतिपादन इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुरेश शिखरे यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील शाहू क्लब, इतिहास विभाग व आयक्यूएसी यांच्या वतीने आयोजित राजश्री शाहू महाराजांचे आपत्ती व्यवस्थापन धोरण या विषयावरील विशेष व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त या व्याख्यानपुष्पाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ सुरेश शिखरे यांच्या हस्ते या व्याख्यानाचे तिसरे पुष्प गुफण्यात आले. प्रारंभि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. सुरेश शिखरे म्हणाले, शाहू महाराजांनी दुष्काळ, प्लेग महामारीच्या निवारण, निर्मूलनासाठी योजलेले धोरण आणि अंमललात आणलेले निर्णय दिशादर्शक होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात दुष्काळ आणि प्लेग निर्मूलनासाठी आपत्तीचा पुर्व अंदाज घेऊन नियोजन, कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची उभारणी, उपाय योजना आणि अंमलबजावणी केली. महाराजांच्या 28 वर्षाच्या कार्यकाळात पाच मोठे दुष्काळ पडले. 1896,1899 ,1905 आणि 1919 असे पाच मोठे दुष्काळ पडले.या दुष्काळाची महाराजांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्यावरती सुयोग्य आणि कायमस्वरूपी निर्णय घेतले. त्यातूनच हा दुष्काळ हटवण्यासाठी त्यांनी राधानगरी धरणाची बांधणी केली. कोरोना पेक्षाही मोठे असे प्लेग चे संकट देशभर ,जगभर आले होते. त्यावरही महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने उपाययोजना करून प्लेगच्या साथीला अटकाव केला. इंग्लंडच्या महाराणीने त्यावेळी त्यांचे अभिनंदन केले होते.
धार्मिक जत्रा यात्रा यावर निर्बंध, गावापासून दूर अंतरावर छावण्या करून त्यासाठी डॉक्टरांचा, औषधांचा पुरवठा त्यावेळी त्यांनी केला. लोकांना फुकट त्यांनी काही दिले नाही. त्या बदल्यात त्यांच्या हाताला काम आणि त्यांच्या कामाला योग्य दाम महाराजांनी दिले. नवीन रस्ते, पूल, तलाव, धरणे यांची कामे त्यांनी सुरू केली.त्या बदल्यात त्यांनी धान्य, जनावरांना वैरण आणि आर्थिक स्वरूपात मोबदला लोकांना दिला. स्वस्त धान्य दुकाने आणि वृद्ध अपंगांसाठी मोफत भोजन त्यांच्या घरी पोहोच करण्याची व्यवस्था त्यांनी केली. आपत्ती व्यवस्थापनाची जगातील दुर्मिळ अशी ही उदाहरणे आहेत.
महाराजांनी आपल्या संस्थानात भ्रष्टाचाराला मूठमाती देऊन कठोर कायदे केले. लोकांच्या हितासाठी अनेक जाहीरनामे प्रसिद्ध केले आणि त्याची अंमलबजावणी ही त्यांनी केली. सव्वाशे वर्षांपूर्वीचे महाराजांचे आपत्ती विषयक धोरण आज ही देशाला नव्हे तर जगाला प्रेरणादायी असे आहे. दुष्काळात आणि कोरोना सारख्या महामारी च्या साथीमध्ये महाराजांच्या या धोरणाची प्रकर्षाने सर्वांना जाणीव झालेली आहे.
डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती दिनानिमित्त महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या उपक्रमातून महाराजांच्या विचारांचा जागर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. सूत्र संयोजन प्रा.पी.के.पाटील यांनी केले. आभार डॉ. विजय देठे यांनी मानले. महाविद्यालयाचे प्रबंधक रवींद्र भोसले, अधिक्षक मनीष भोसले सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय स्टाफ यावेळी उपस्थित होता.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
राजर्षी शाहू महाराजांचे आपत्ती विषयक धोरण आजही देशाला दिशादर्शक; डॉ.सुरेश शिखरे
|