बातम्या
कोल्हापूरवासीय, कलाकार, कलाप्रेमींच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार : राजेश क्षीरसागर
By nisha patil - 9/30/2024 11:21:44 PM
Share This News:
कोल्हापूर दि.३० : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरच्या कला क्षेत्राचे नुकसान झाले. नाट्यगृहाची वास्तू जशीच्या तशी उभी राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याठिकाणी भेट देण्याची आपण विनंती केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ घटनास्थळी भेट देवून कलाकारांना दिलासा दिला. नाट्यगृह पुढील काळात दिमाखात उभे करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नगरविकास विभागाकडून "महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद" या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका जि. कोल्हापूर करिता "कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाचे नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे." या कामांकरिता रक्कम रु.२५,१०,०००/-(अक्षरी रक्कम रु. पंचवीस कोटी दहा लक्ष मात्र) इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
ते पुढे म्हणाले, कलापूरची रंगभूमी आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे एक अतूट समीकरण आहे. रंगभूमीच्या एकूणच प्रवासाचं हे नाट्यगृह प्रमुख साक्षीदार असून, इथला प्रत्येक रंगकर्मी जगाच्या रंगभूमीवर गाजला. कोल्हापूरची अस्मिता असलेले हे नाट्यगृह आगीत बेचिराख झाले. या नाट्यगृहाबाबतीत कोल्हापूरवासीयांच्या जोडलेल्या भावनांचा सहानुभूतीने विचार करून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी घटनास्थळी भेट देवून निधी जाहीर केला होता. आज नगरविकास विभागाने शासन आदेशाद्वारे रु.२५ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. कोल्हापुरवासीय, कलाकार, कलाप्रेमींना दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळला आहे. मंजूर निधीतून लवकरच कामास सुरवात होणार असून, कोल्हापूरची अस्मिता पुन्हा त्याच दिमाखात उभी राहिल्याचे दिसून येईल. मंजूर केलेल्या निधीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही जाहीर आभार मानत असल्याचे सांगितले.
कोल्हापूरवासीय, कलाकार, कलाप्रेमींच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार : राजेश क्षीरसागर
|