बातम्या

सत्यजित कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत चर्चा केली

Satyjit kadam


By nisha patil - 10/1/2025 11:28:48 PM
Share This News:



शिवसेना नेते सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी दरवर्षी मार्च अखेरीस देण्यात येणारी ५०% घरफाळा सवलत यंदा लवकरच लागू करण्याची मागणी केली. या सवलतीमुळे कर्मचारी वर्गावर येणारा वसुलीचा ताण कमी होईल आणि नागरिकांना घरफाळा भरण्यासाठी प्रेरणा मिळेल.

 

त्यांनी याकडे लक्ष वेधले की, जप्तीच्या नोटिसा पाठविणे किंवा कठोर कारवाई करण्याची वेळ येण्याआधीच नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेतल्यास प्रशासन आणि नागरिक यांच्यात सकारात्मक संबंध निर्माण होतील. तसेच, अपुरी सीएफसी (सिटिझन फॅसिलिटेशन सेंटर) सेंटर्स आणि त्यामध्ये नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या असुविधा आणि त्रास याकडेही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. या सेंटर्समधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ सुविधा निर्माण करणे, आणि वसुलीसाठीची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करणे यावर त्यांनी भर दिला.

 

सत्यजित कदम यांनी कमी मुदतीत होणारी आर्थिक तारांबळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ताणतणाव टाळण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. यासोबतच, नागरिकांना आर्थिक दिलासा आणि अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

महानगरपालिका आयुक्तांनी या सूचनांचे गांभीर्य लक्षात घेतले आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि सोयीस्कर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक त्या पावलं उचलण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे, कोल्हापूर शहरातील नागरिकांना येणाऱ्या आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींवर तोडगा काढण्याची प्रक्रिया गतीमान होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.


सत्यजित कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत चर्चा केली
Total Views: 52