बातम्या
सतेज पाटील पूरग्रस्तांची चेष्टा करताना भान राखा- सत्यजित कदम यांची खरमरीत टीका
By nisha patil - 7/30/2024 11:08:18 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने विळखा घातला असला तरी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. तसेच अनेकांच्या घरात महापुराचे पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्य आणि इतर संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.
शासकीय नोंदीनुसार 30,284 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, भात, ज्वारी,सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये अशा विविध खरीप पिकांचा समावेश आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सध्या नजर अंदाज पंचनामे सुरू आहेत. महापुराचे पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर पीक नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे केले जाणार आहेत.
तसेच जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांची हानी झाली आहे. याही नुकसानीची पाहणी प्राथमिक स्तरावर शासकीय यंत्रणे कडून करण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती असताना सतेज पाटील यांनी मात्र नेहमीप्रमाणे यातही राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे. पूरग्रस्तांना 'लाडके पूरग्रस्त' म्हणून सतेज पाटील यांनी त्यांची क्रूर चेष्टा केली आहे. वास्तविक नैसर्गिक आपत्ती आली असताना राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना मदत करणे अपेक्षित असते पण सदा सर्वकाळ केवळ राजकारणाचा विचार करणाऱ्या सतेज पाटील यांच्याकडे तेवढी परिपक्व नीतिमत्ता नाही असा टोला माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी लगावला.
2021 साली आलेल्या प्रलयंकारी महापुरात अनेकांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी पालकमंत्री असलेल्या सतेज पाटील यांनी काय दिवे लावले हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे असेही ते म्हणाले.
केवळ स्टंटबाजी करण्यासाठी पुराच्या पाण्यात उतरून काहीतरी केल्याचा आव सतेज पाटील आणत आहेत असा टोलाही कदम यांनी लगावला. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करण्याचा सतेज पाटील यांचा केविलवाणा प्रयत्न आहे पण मतदार आता शहाणे झाले आहेत अशी टीकाही सत्यजित कदम यांनी केली.एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, सतेज पाटील यांनी काळजी करू नये अशा शब्दात सत्याजित कदम यांनी पाटील यांचा समाचार घेतला.
सतेज पाटील पूरग्रस्तांची चेष्टा करताना भान राखा- सत्यजित कदम यांची खरमरीत टीका
|