बातम्या
शिंदे सरकारचा जाहिरातीवर 270 कोटी खर्च
By nisha patil - 7/31/2024 2:07:48 PM
Share This News:
एकीकडे जवळ आलेली विधानसभेची निवडणूक, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे जाहीर होणाऱ्या नवनवीन योजना आणि दुसरीकडे या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणाऱ्या अतिरिक्त ताणाची चर्चा होत असताना, आता अजून एक मोठा खर्च सरकारी योजनांच्या प्रसिद्धीवर करण्यासाठी राज्य सरकारनं घेतलेला नवीन निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
270 कोटी रुपये, सरकारनं प्रसिद्धीवर खर्च करायचं ठरवलं आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं सोमवारी 29 जुलैला हा शासन निर्णय प्रकाशित केला आहे. त्यात सरकारच्या या खर्चिक मनसुब्याची माहिती आहे.मार्च 2025 पर्यंत माध्यम आराखड्याचा हा खर्च प्रस्तावित आहे असं जरी यात म्हटलं असलं तरी कोणत्याही सरकारची अपेक्षा निवडणूक आचारसंहितेपूर्वी अधिक प्रचार व्हावा ही असेलच.
नुकत्याच जाहीर झालेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना', 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना' यासोबतच इतर सरकारी लोकप्रिय योजनांचा प्रचार करण्यासाठी हा खर्च आवश्यक असल्याचं या निर्णयात म्हटलं आहे.या योजना निवडणुकांवर डोळा ठेवून आखण्यात आलेल्या आहेत, असा आरोप करणारे विरोधी पक्ष, या योजनांच्या प्रचाराच्या निर्णयावरही तुटून पडले आहे. सरकार आपल्या निर्णयाचं समर्थन करतं आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप एका बाजूला, पण काही सामाजिक कार्यकर्त्यां, अभ्यासकांना आणि सामान्यांनाही पडलेला प्रश्न म्हणजे, सद्यस्थितीत केवळ प्रसिद्धीवर हा खर्च आवश्यक आहे का?
शिंदे सरकारचा जाहिरातीवर 270 कोटी खर्च
|