बातम्या

टिप्पर चालक घोटाळ्याची व्याप्ती वाढली, एकूण अडीच कोटींचा घोटाळा- आप ने दाखवली कागदपत्रे

The scope of tipper driver scam has increased


By nisha patil - 12/27/2024 10:10:59 PM
Share This News:



शहरातील कचरा उठाव करण्यासाठी 254 टिप्पर चालकांचे कंत्राट एकूण सहा ठेकेदारांकडे आहे. परंतु फक्त 190 चालक पुरवत वरील 70 चालकांचे पगार लाटून ठेकेदारांनी दीड कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला होता. 

चालकांना किमान वेतनानुसार 25,300 इतके वेतन देणे बंधनकारक आहे. परंतु फक्त पंधरा हजार रुपयां प्रमाणे त्यांचा पगार करून 190 चालकांचे मागील आठ महिन्यात चालकांच्या पगारातून एक कोटीहुन अधिक रक्कम ठेकेदारांनी लाटली. चालकांचे बँक स्टेटमेंट व ठेकेदारांनी पी एफ ऑफिसला सादर केलेल्या कागदपत्रांमधून हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून ती अडीच कोटी झाल्याचा गंभीर आरोप आप चे प्रदेश संघटन संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.

घोटाळा झाला नाही तर मग चालकांच्या कामाची नोंद असणारे फाळणी पुस्तक गायब का करण्यात आले असा सवाल आप ने उपस्थित केला. टिप्पर चालकांवर कंत्राटदारांनी दबाव टाकला जात आहे. परंतु याच चालकांनी आमच्याकडे त्यांची कागदपत्रे दिली आहेत.

रक्षक कंपनीने महापालिकेकडे जमा केलेल्या पी एफ चलनात एकही टिप्पर चालक नसल्याचे समोर आले आहे. साई एजेंसीने पी एफ कार्यालयाकडे जमा केलेल्या माहितीनुसार ते ग्रॉस वेतन म्हणून फक्त पंधरा हजारच कमचाऱ्यांना देत असल्याचे समोर आले आहे. व्ही डी के फॅसिलिटी या कंपनीने जमा केलेल्या पगाराच्या नोंदी असलेले स्टेटमेंटमध्ये ते पंधरा हजार पेक्षा कमी पगार देत असल्याचे दिसत आहे. 

त्यामुळे हे सर्व ठेकेदार प्रत्येक चालकाच्या पगारात ढपला मारत आहेत हे उघडकीस येते. महापालिकेकडून ठेकेदारांचे स्थानिक प्रतिनिधी कोण याची  माहिती  मागवली असून हा ठेका महापालिकेतल्या कोणत्या कारभार्यांकडे आहे ते लवकरच समोर येईल असा दावा शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला आहे.

ज्या टिप्पर चालकावर दबाव टाकून आप वर आरोप केले गेलेत तो एका ठेकेदाराचा मावसभाऊ आहे. तसेच या चालकाला देखील पंधरा हजारच पगार दिला जात असल्याचे पी एफ कार्यालयाकडे जमा केलेल्या कागदपत्रामध्ये दिसते. हे सर्व आरोप बदनामी करण्यासाठी तसेच घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. ज्यांनी आरोप केलेत त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा आप च्या वकील संघटनेकडून केला जाणार आहे.

ठेकेदारांनी लाटलेला पैसा हा कोल्हापुरच्या नागरिकांच्या करातून आलेला आहे. त्यामुळे या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाऊन हे पैसे महापालिकेला वसुल करण्यास भाग पाडू, प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा आप चे महासचिव अभिजित कांबळे यांनी दिला. 

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, मयुर भोसले, राकेश गायकवाड, संजय नलवडे, शशांक लोखंडे, अमरसिंह दळवी, प्राजक्ता डाफळे, प्रतीक माने, सचिन पाटील आदी उपस्थित होते.


टिप्पर चालक घोटाळ्याची व्याप्ती वाढली, एकूण अडीच कोटींचा घोटाळा- आप ने दाखवली कागदपत्रे
Total Views: 58