बातम्या

'पायवाटाची सावली' चित्रपटातून उलगडणार लेखकाच्या आयुष्यातील खडतर प्रवास

The tough journey of the writer


By nisha patil - 8/17/2024 6:51:59 PM
Share This News:



 सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. या चित्रपटांना भरभरून रसिक मायबाप प्रतिसाद देत आहे. अशा चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचे कथानक एका लेखकाचा प्रवास मांडणारा आहे. 'पायवाटाची सावली' असे चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित होईल. लेखकाच्या आयुष्यातील प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज चित्रपटात पाहायला मिळेल. गावातील जीवनशैली आणि साधे राहणीमान प्रेक्षकांना आकर्षित करेल.

'मीना शमीम फिल्म्स' प्रस्तुत 'पायवाटाची सावली' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी पेलवली आहे. निर्मितीची बाजू 'मीना शमीम फिल्म्स'ने सांभाळली आहे. संगीत बॉलिवूडमधील महान संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास यांचे आहे. चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वितरक अकात डिस्ट्रीब्युशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक-लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी सांगितले, मी या आधी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. एक हिंदी चित्रपट लाखों हैं यहां दिलवाले, निवडुंग, गाव पुढे आहे, उडत गेला हे तीन मराठी चित्रपट. चमत्कार कसे होतात? देव आहे की नाही? असे प्रश्न मला पडायचे. यातूनच मला 'पायवाटाची सावली'  या चित्रपटाचे कथानक सुचले. आशयघन असणाऱ्य़ा या चित्रपटात एका लेखकाचा प्रवास उलगडणार आहे. एखादी व्यक्ती आयुष्यात हरते तेव्हा त्याच्यावर काय परिस्थिती ओढवते पण जेव्हा ती यशाच्या शिखरावर पोहोचते तेव्हा त्याचा प्रवास कसा उलगडतो याचे उदाहरण यात दर्शविले आहे. आम्ही हा चित्रपट १३ सप्टेंबरला तुमच्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात घेऊन येत आहोत.


'पायवाटाची सावली' चित्रपटातून उलगडणार लेखकाच्या आयुष्यातील खडतर प्रवास