बातम्या
श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याद्वारे शहराच्या पर्यटनवाढीला चालना देवू : राजेश क्षीरसागर
By nisha patil - 8/16/2024 7:25:35 PM
Share This News:
कोल्हापूर दि.१६ : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे देशातील ५१ शक्तीपिठापैकी एक प्रमुख पीठ आहे. या मंदिरास दरवर्षी कोट्यावधी भाविक दर्शनाकरिता देश परदेशातून येत असतात. महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या जागृत असणाऱ्या या मंदिरात नवरात्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या कालावधीत सुमारे २५ लाखापेक्षा अधिक भाविक देशभरातून दर्शनाकरीता येतात. आई अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या स्थानिक नागरिकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी पर्यटनात वाढ होणे गरजेचे आहे. कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात भाविकांना सोयी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विकासात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याद्वारे शहराच्या पर्यटन वाढीला चालना देवू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून पापाची तिकटी येथील श्री लक्ष्मी गल्ली व श्री दत्त गल्ली येथील रस्ते पॅसेज काँक्रिटीकरण करणे या विकास कामांचा शुभारंभ आज भागातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उद्घाटनाच्या सुरवातीस परिसरातील जेष्ठ नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे लोकाभिमुख व लोककल्याणकारी कामकाज सुरु आहे. आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात कोट्यावधींचा निधी कोल्हापूर शहराला प्राप्त झाला आहे. आई अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्रासाठीही राज्य सरकार सकारात्मक असून, यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. कोल्हापूरच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपक्रम आम्ही हाती घेत असून, लवकरच पर्यटन वाढीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नवाढीत भर घालण्यासाठी उपायोजना केल्या जाणार आहेत. यास लवकरच यश आलेले पहायला मिळेल, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेवक ईश्वर परमार, चंद्रकांत उर्फ बाबा साळोखे, सयाजी भोसले, पंडित साळोखे, राजेंद्र कुंभार, अभिषेक खुपेरकर, राहुल खुपेरकर, संजय कारेकर, सुशांत भोसले अनिल वागवेकर, अमर पावसकर, स्वप्नील बिडकर, संदीप कोठावळे, अभिजित वागवेकर, यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याद्वारे शहराच्या पर्यटनवाढीला चालना देवू : राजेश क्षीरसागर
|