बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने आजपासून विविध कार्यक्रम

Various programs on behalf of the district administration on the centenary golden jubilee


By nisha patil - 6/25/2024 2:02:22 PM
Share This News:



 भारताच्या इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्व व कोल्हापूरकरांचा मानबिंदू असलेले आदर्श राजे, पुरोगामी विचारांचे महान समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची दिनांक 26 जून 2024 शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी होत आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त दिनांक 25 जून ते 30 जून 2024 या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील शाहूप्रेमी व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

     राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सव समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 


राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त 25 ते 30 जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.. 

 दि. 25 जून 2024 रोजी "शाहू विचार जागर" हा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व तालुका ठिकाणी होणार आहे.

दिनांक 26 जून रोजी सकाळी 8 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला शाहू जन्मस्थळ येथे पुष्पांजली व पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वा. दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पांजली व पुष्पहार अर्पण (पोलीस बँड मानवंदना). सकाळी 10 वाजता सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

       दिनांक 26 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता शोभायात्रा- दसरा चौक-बिंदू चौक- मिरजकर तिकटी- कोल्हापूर म.न.पा.- शाहू समाधी स्थळ या मार्गे असेल. यात सर्व खेळाडू पैलवान, सर्व बोर्डींगमधील विद्यार्थी, महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 
सकाळी 10.30 वा. सर्व तालुका स्तरावर स्वतंत्र शोभायात्रा होणार  आहे.  तसेच जिल्ह्यात सर्व ठिकाणी "शाहू विचारांवर आधारित 150 व्याख्याने शिवाजी विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयात होणार आहेत.

             दिनांक 27 जून 2024 रोजी परिसंवाद- राजर्षी शाहू आणि सिंचन  हा कार्यक्रम राधानगरी धरण येथे होणार आहे. परिसंवाद- समाज, अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू हा कार्यक्रम माणगांव ता. हातकणंगले येथे होणार आहे.  

             दिनांक  28 जून  2024 रोजी परिसंवाद- उद्योगापुढील आव्हाने आणि वातावरण बदल हा कार्यक्रम कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे होणार आहे. तसेच परिसंवाद- राजर्षी शाहू कृषी विकास हा कार्यक्रम वारणानगर येथे होणार आहे. परिसंवाद - जंगल रक्षण व राजर्षी शाहू हा कार्यक्रम आंबा, ता.शाहुवाडी येथे पार पडणार आहे.

दिनांक 29 जून 2024 रोजी परिसंवाद- आरोग्याचे प्रश्न  तसेच परिसंवाद- वस्त्रोद्योगापुढील आव्हाने हा इचलकरंजीतील डी.के.टी.ई कॉलेज येथे होणार आहे. 

 दिनांक 30 जून 2024 रोजी महिला बचतगटांचा मेळावा कोल्हापुरात होणार आहे. तसेच इचलकरंजी येथे कामगार  मेळावा होणार आहे. तर मौनी विद्यापीठ, गडहिंग्लज येथे शेतकरी- कामगार मेळावा होणार आहे. याबरोबरच प्रसन्न मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन-कलेक्टर ऑफिस, दसरा चौक, सायन्स कॉलेज, वैदीक शाळा, केशवराव भोसले नाट्यगृह, साठमारी, शाहू समाधी स्थळ, न्यू पॅलेस, शाहू जन्मस्थळ या मार्गावर हेरिटेज वॉक घेण्यात येणार आहे. 

दिनांक 1 जुलै 2024 पासून पुढील 52 आठवड्यांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम जिल्हा व तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आणि समाजकार्यावर आधारित निबंध, वक्तृत्व, चित्रकला, कुस्ती स्पर्धांचे आयोजन, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवर विविध लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे, ग्रंथांचे भव्य प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर व समाजकार्यावर आधारित महानाट्य आयोजित करणे, तसेच शॉर्ट फिल्म निर्मिती स्पर्धा आदी उपक्रम राबवण्याबाबत तसेच  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवरील मालिका पुन्हा टीव्ही चॅनेलवर प्रसारित करणे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे प्रयोग जिल्ह्यात आयोजित करणे, चित्रनगरी येथे कलाकारांचा मेळावा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्या वतीने  राज्य शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
***

 


राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने आजपासून विविध कार्यक्रम