बातम्या

विवेकानंद कॉलेजला राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (नॅक) कडून A+ ग्रेड प्राप्त

Vivekanand college A gred


By nisha patil - 10/28/2024 2:27:05 PM
Share This News:



कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) या महाविद्यालयास दिनांक 14 व 15 ऑक्टोबर, 2024 रोजी नॅक 4th cycle साठी नॅक पिअर टीमने भेट दिली. या समितीचे प्रमुख संबळपूर विद्यापीठ, ओरिसाचे माजी कुलगुरु प्रोफेसर बिष्णू चरण बरीक हे होते तर समितीचे समन्व्‍यक अलिगड मुस्लीम विद्यापीठ, उत्तरप्रदेश मधील कॉमर्स विभागप्रमुख व माजी डीन डॉ. नवाब अली खान व समितीचे सदस्य एम. जी. सायन्स इन्स्टिटयुट, अहमदाबाद, गुजरातचे प्राचार्य डॉ. भानूकुमार जैन यांचा समावेश होता.

 

विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालये यांच्या मुल्यांकनामध्ये वेगळेपण असते. स्वायत्त महाविद्यालयाचे मुल्यांकन हे विद्यापीठाच्या मुल्यांकनासारखे असते. अशावेळी गुणवत्ता टिकवून ठेवणेसुद्धा कठीण असते. असे असतानाही अधिकारप्रदत स्वायत असणाऱ्या विवेकानंद कॉलेजने आपल्या गुणवत्तेमध्ये वाढ करून राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (नॅक) च्या 4th cycle मध्ये मोठी भरारी घेऊन 3.29 CGPA सह A+ ग्रेड मिळविलेली आहे. सन 2016 मध्ये झालेल्या नॅक 3rd Cycle मध्ये विवेकानंद कॉलेजला 3.24 CGPA सह A ग्रेड मिळालेली होती. त्यानंतर महाविद्यालयाने स्वायत होण्याचा बहुमान पटकावला होता.

 

   याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्यागातून आणि ध्येयातून उभा राहिलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या नावलौकिकात विवेकानंद कॉलेजने अजून भर घातली आहे. विवेकानंद कॉलेजने अशीच उत्तमोत्तम प्रगती करावी, असे प्रतिपादन केले. तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांनी, विवेकानंद कॉलेज हे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रमानांकित महाविद्यालय आहे. विवेकानंद कॉलेजने कला, क्रिडा, शिक्षण, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. महाविद्यालयाच्या यशाचा हा महामेरु असाच पुढे चालत राहावा आणि विवेकानंद कॉलेजने अशीच यशाची शिखरे पादांक्रित करावीत, असे मनोगत मांडले.

 

     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी, विवेकानंद कॉलेजने स्थापनेपासूनच नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. विवेकानंद कॉलेज हे शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील नेहमीच अग्रेसर कॉलेज म्हणून ओळखले जाते. विवेकानंद कॉलेजला मिळालेले हे यश येथील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांच्या कष्टाचे फळ आहे. गेल्या सहा वर्षात महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाने घेतलेल्या कष्टाचे हे यश आहे, असे मत मांडले. तर IQAC च्या समन्वयक प्रा. डॉ . श्रुती जोशी यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये नॅक मुल्यांकन ही महत्त्वाची गोष्ट असते, परंतु विवेकानंद कॉलेजमध्ये ही जबाबदारी पार पाडताना कोणताही ताण जाणवला नाही. कॉलेजमध्ये प्रत्येक घटकाने घेतलेले कष्ट आणि केलेली मदत यामुळेच मी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकले. मंदिराचा पाया भक्क्‍म असेल तरच कळस टिकून राहतो, त्याप्रमाणे कॉलेजच्या सर्वच घटकांनी पाया भक्कम करुन यशाचा हा कळस गाठला आहे, असे मत मांडले.

 

     यावेळी नॅक स्टेअरिंग कमिटीचे प्रमुख प्रा डॉ. एस. आर. कट्टीमनी यांनी विवेकानंद कॉलेजला मिळालेल्या या यशात कॉलेजमधील सर्वच घटकांचा मोठा वाटा आहे. प्रत्येक घटकांने केलेली जीवतोड मेहनत आणि कॉलेजच्या विकासात बजावलेली भूमिका यातूनच आपल्याला हे यश मिळाले आहे. नॅक समितीकडून मिळालेली A+ ही ग्रेड समाधानकारक असून याच्या पुढे महाविद्यालयाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, असे मनोगत मांडले.

 

महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. महाविद्यालयाच्या नॅक कामकाजासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, IQAC च्या समन्वयक प्रा. डॉ . श्रुती जोशी, नॅक स्टेअरिंग कमिटीचे प्रमुख डॉ. एस आर. कट्टीमनी, सर्व क्रायटेरियांचे प्रमुख व सदस्य, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, रजिस्ट्रार श्री. आर. बी. जोग, प्रशासकीय कर्मचारी प्रमुख हितेंद्र साळुंखे, नाईक रवी चौगुले व सर्व प्रशासकीय कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.


विवेकानंद कॉलेजला राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (नॅक) कडून A+ ग्रेड प्राप्त