बातम्या

नागपंचमीच्या दिवशी तवा, चाकू का वापरत नाही? जाणून घ्या नागपंचमीची कथा

Why not use tawa knife on Nag Panchami


By nisha patil - 9/8/2024 8:35:28 AM
Share This News:




श्रावण हा पवित्र महिना आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सण-उत्सवाला खास महत्व आहे. या सण-उत्सवाचे विशेष महत्व आहे. शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे.नागपंचमीचे महत्व आणि मान्यता

हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी, चपाती केली जात नाही, असे का होते ते जाणून घेऊया.

नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये. मान्यतेनुसार, पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो. या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून, तवा, सुई, चाकू यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो. यादिवशी कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करू नये, असे केल्याने सापाचे बिळ जमिनीत असते जे तुटण्याची भीती असते.नागपंचमीची कथा
एक आटपाट नगर होतं. तीथे एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब राहत होते. एकदा शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायकोमुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिलादेखील दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूधलाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.


नागपंचमीच्या दिवशी तवा, चाकू का वापरत नाही? जाणून घ्या नागपंचमीची कथा