बातम्या

नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची ‘गोकुळ’ ला भेट...

Women milk producers of Nagpur visit Gokul


By nisha patil - 9/27/2024 11:14:32 PM
Share This News:



कोल्‍हापूर,ता.२७: नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत नागपूर येथील १०० महिला दूध उत्पादक शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी आले असता त्यांनी आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मुख्य दुग्ध प्रकल्पास गोकुळ शिरगाव येथे भेट दिली.

यावेळी त्यांनी गोकुळच्या मुख्य प्रकल्पास भेट देऊन तेथील व्यवस्थापन, संकलन, प्रक्रिया, उत्पादन, पॅकिंग याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, गोकुळ दूध संघाचे व्‍यवस्‍थापन व कामाची पद्धत पाहून महिला शेतकरी भारावून गेल्या. गोकुळमार्फत दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, दूध खरेदी दर याची सविस्तर माहिती देण्यात आली. अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला दूध उत्पादक शेतकरी यांनी गोकुळ राबवित असलेल्या दूध उत्पादकांच्या हिताच्या अनेक योजनेचे व खास करून जनावरांच्या वरील आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे त्यांनी कौतुक करून गोकुळने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली प्रगती दूध उत्पादकांच्या उत्कर्षाला चालना देणारी असल्याचे हे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

 यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला शेतकऱ्यांचे स्वागत केले व दुग्ध व्यवसायाविषयी चे सखोल मार्गदर्शन गोकुळ निश्चितच करेल असे आश्वासन दिले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक किसन चौगले, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत, जिल्हा परिषद नागपूर कृषी व पशुसंवर्धनचे सभापती प्रविण जोध, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे, पशुधन विकास अधिकारी डॉ.शकील अगवान, डॉ. राधा भोईटे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, महिला अधिकारी गीता उत्तुरकर, तृप्ती मदने व दूध उत्पादक महिला व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
 


नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची ‘गोकुळ’ ला भेट...