बातम्या
आप छेडणार खड्डेमुक्ती आंदोलन
By nisha patil - 10/8/2024 7:54:16 PM
Share This News:
आप छेडणार खड्डेमुक्ती आंदोलन
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेस घेराव
शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमय प्रवासाने नागरिक हैराण झाले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच शहरातील रस्ते मुदतीआधी खराब झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. याविरोधात खड्डेमुक्ती आंदोलन छेडले जाणार असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेच्या इमारतीस मानवी साखळीने नागरिकांचा घेराव घालून शहरातील रस्ते दर्जेदार करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
अमृत योजना, गॅस पाईपलाईन कामासाठी शहरात मोठ्या प्रमाणात खुदाई झाली आहे. परंतु अद्याप या कामाचे रिस्टोरेशन झालेले नाही. तसेच खड्डे बुजवण्यासाठी लाल मुरूम वापरल्याने थोडा पाऊस पडल्याने देखील चिखल होत आहे. या परिस्थितीत रस्त्यावरून येजा करणे जिकिरीचे बनले आहे.
महापालिका क्षेत्रातील चारशे रस्ते दोष दायित्व मुदतीत आहेत असे जर प्रशासक स्वतः मान्य करत असतील तर संबंधित ठेकेदारांकडून ते अद्याप दुरुस्त का करून घेतले नाहीत असा सवाल आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी उपस्थित केला.
महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी या खड्डेमुक्ती आंदोलनाची सुरुवात केली गेली असून या आंदोलनामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी मिस्ड कॉल नंबर जाहीर करण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी याबाबत जनजागृती करण्यासाठी कोपरा सभा घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
येत्या चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता मानवी साखळी करून महापालिकेस घेराव घालण्यात येणार असून यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सुरज सुर्वे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, अमरसिंह दळवी, संजय नलवडे, रमेश कोळी, ऋषिकेश वीर, राकेश गायकवाड आदी उपस्थित होते.
आप छेडणार खड्डेमुक्ती आंदोलन
|