बातम्या

क्षयमुक्त ग्रामपंचायतींनी जवळच्या १० गावांची क्षयमुक्तीसाठी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी घ्यावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

amol yedge


By Administrator - 4/10/2024 12:54:50 PM
Share This News:



वर्ष २०२३ मध्ये कोल्हापूर ग्रामीण मधील ८२ ग्रामपंचायती  क्षयमुक्त  झाल्या असून यासाठी सर्व घटकांनी परिश्रम घेतले. आता क्षयमुक्त ग्रामपंचायतींनी जवळच्या १० गावांची  क्षयमुक्तीसाठी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी  घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. छत्रपती शाहूजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे क्षयमुक्त ग्रामपंचायती च्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी अध्यक्षीय  भाषणावेळी ते बोलत होते. यावेळी करवीर तालुक्यातील पासार्डे, ऊपवडे, केकतवाडी, शेळकेवाडी या ग्रामपंचायातींचा क्षयमुक्त ग्रामपंचायत म्हणून म्हणून सन्मान करण्यात आला.

 

जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, जर इतर ग्रामपंचायती क्षयमुक्त न होता तशाच राहिल्या तर आपल्याला क्षयमुक्त जिल्हा करता येणार नाही, त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेऊन आपला परिसरच क्षयमुक्त ठेवावा. तसेच यासाठी आरोग्य विभागाने क्षयमुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यावर जोर द्यावा त्यामुळेही  केंद्रातील सर्व गावे क्षयमुक्त होतील.  पर्यायाने तालुका, जिल्हा क्षयमुक्त होण्यास मदत होईल. पुढील वर्षी हा क्षयमुक्त ग्रामपंचायतींची संख्या १०० च्या वरती जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले.

 मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस. यांनी यावर्षी २०२४ मध्ये सर्व ग्रामपंचायतीनी क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियानात  भाग घ्यावा असे आवाहन केले. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी प्रास्ताविकामध्ये क्षयमुक्त  ग्रामपंचायती साठी पात्रता निकष सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे यांनी आरोग्य विभागाद्वारे क्षयमुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र मोहीम राबवून जास्तीत जास्त गावे क्षयमुक्त करण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी करवीर तालुक्यातील पासार्डे, ऊपवडे, केकतवाडी, शेळकेवाडी  या ग्रामपंचायातींचा क्षयमुक्त ग्रामपंचायत म्हणून मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांचा ब्राँझ पुतळा व सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

 यावेळी निवडलेल्या ग्रापंचायतींचे  सरपंच, उपसरपंच, संबधित प्रा. आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व ग्रामसेवक यांनी पुरस्कार  स्विकारला. ग्रामपंचायत शेळकेवाडीचे सरपंच यांनी आम्ही अशाच पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने हा सन्मान पुढील वर्षी ब्राँझ वरून सिल्वर असा  कायम ठेवू अशी ग्वाही दिली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये 65 ग्रामपंचायतीचे उद्दिष्ट राज्य स्तरावरून प्राप्त होते तथापि २०२३ मध्ये १०५ ग्रामपंचायतींनी या अभियानामध्ये भाग घेतला. या स्पर्धेत समितीने पडताळणी केल्यानंतर ८२ गावे टीबी मुक्त ग्रामपंचायत साठी पात्र ठरली अशी माहिती दिली. शिवाजी बर्गे यांनी आभार मानले. यावेळी गट विकास अधिकारी विजय यादव, अति. जिल्हा आरोग्य डॉ. उत्तम मदने, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.माधव ठाकूर, वैद्यकीय अधिकारी डॉ.परवेज पटेल, विशाल मिरजकर, दिया कोरे, धनंजय परिट, विनोद नायडू उपस्थित होते.

 


क्षयमुक्त ग्रामपंचायतींनी जवळच्या १० गावांची क्षयमुक्तीसाठी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी घ्यावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे