बातम्या
*पणदुरकर दाम्पत्याने शिवाजी विद्यापीठास दिली 25 लाखांची देणगी
By Administrator - 8/20/2024 12:17:55 PM
Share This News:
*पणदुरकर दाम्पत्याने शिवाजी विद्यापीठास दिली 25 लाखांची देणगी, एकूण योगदान 60 लाख*
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त भूगोल अधिविभागप्रमुख व ज्येष्ठ कायदा अभ्यासक डॉ.ॲड. राम पणदुरकर व त्यांची पत्नी सौ. हेमकिरण यांनी त्यांच्या दिवंगत कन्या कै. डॉ.ॲड. रूपाली पणदुरकर यांच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ महिला वसतिगृहातील अभ्यासिकेसाठी 25 लाखांची देणगी दिली आहे. या देणगीमुळे पणदुरकर दाम्पत्याचे विद्यापीठाला एकूण योगदान 60 लाखांपर्यंत पोहोचले आहे.
डॉ.ॲड. राम पणदुरकर व सौ. हेमकिरण यांनी यापूर्वी 35 लाखांची देणगी दिली होती, ज्यातून अभ्यासिकेच्या तळ मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. आता, विद्यापीठ व्यवस्थापनाने अभ्यासिकेचा पहिला मजला बांधण्यासाठी पुढाकार घेतल्याने, पणदुरकर दाम्पत्याने 25 लाख रुपयांची आणखी देणगी दिली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना आज या देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, आणि डॉ. संभाजी शिंदे हे उपस्थित होते.
पणदुरकर दाम्पत्याच्या अर्थसहाय्यामुळे अभ्यासिकेची संपूर्ण इमारत लवकरच पूर्ण होईल अशी आशा विद्यापीठाने व्यक्त केली आहे. विद्यापीठाने आगामी पुण्यतिथीपर्यंत या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्याचा मानस व्यक्त केला आहे. नारळी पोर्णिमा व रक्षाबंधन या शुभदिनी अभ्यासिकेच्या रूपात दिलेली ही सप्रेम भेट मुलींनी त्यांच्या शिक्षणात यश मिळवून विद्यापीठाचे नाव उज्वल करावे, अशी भावना पणदुरकर दाम्पत्याने व्यक्त केली.
*विद्यार्थ्यांच्या डोळ्यात रूपालीचं रूप पाहाण्याचं ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचं सर्वत्र अभिनंदन व कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.*
*पणदुरकर दाम्पत्याने शिवाजी विद्यापीठास दिली 25 लाखांची देणगी
|