इचलकरंजी महापालिका थकीत 1043 कोटींच्या परताव्यासाठी हालचालींना गती
By nisha patil - 3/3/2025 3:12:45 PM
Share This News:
इचलकरंजी महापालिका थकीत 1043 कोटींच्या परताव्यासाठी हालचालींना गती
डॉ. राहुल आवाडे व प्रकाशआण्णा आवाडे यांचा ठाम पाठपुरावा
उपमुख्यमंत्र्यांचे तातडीने प्रस्ताव कॅबिनेटला देण्याचे निर्देश
इचलकरंजी महानगरपालिकेचा तब्बल 1043 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा दोन वर्षांपासून रखडलेला असून, या मुद्द्यावर आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीत तातडीने प्रस्ताव कॅबिनेटपुढे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे परतावा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
2022 मध्ये महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतरही जीएसटी परताव्यातून इचलकरंजीला वंचित ठेवण्यात आले, याकडे आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी लक्ष वेधले. महानगरपालिकेच्या विकासकामांना त्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. राज्यातील अन्य 26 महानगरपालिकांना जीएसटी परतावा मिळतो, मग इचलकरंजीला का नाही, असा सवाल माजी मंत्री आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी उपस्थित केला.
महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनीही परतावा रखडल्याने येणाऱ्या आर्थिक अडचणींचा आढावा बैठकीत दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर कॅबिनेट निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
हा परतावा मिळाल्यानंतर महानगरपालिकेची थकीत देणी भागवून शहरात रेंगाळलेल्या विकासकामांना चालना मिळणार आहे. त्यामुळे इचलकरंजीकरांसाठी ही सकारात्मक बातमी ठरणार असून, मोठ्या विकासाची नवी दिशा मिळणार आहे.
इचलकरंजी महापालिका थकीत 1043 कोटींच्या परताव्यासाठी हालचालींना गती
|