बातम्या

*बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी विराट मोर्चा; २१ ऑगस्ट रोजी हजारो कामगार सहभागी होणार*

morcha of bandhkam kamgar


By Administrator - 8/17/2024 3:26:37 PM
Share This News:



*बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी विराट मोर्चा; २१ ऑगस्ट रोजी हजारो कामगार सहभागी होणार*

कोल्हापूर: बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी २१ ऑगस्ट रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील हजारो कामगार सहभागी होणार असून, त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दिवाळी बोनस, पेन्शन, आणि मेडिक्लेम योजनेत सुधारणा यांचा समावेश आहे. 

या संदर्भात उत्तूर येथे झालेल्या बैठकीत कॉ. शिवाजी मगदूम यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्व बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा, ६० वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना महिन्याला १० हजार रुपये पेन्शन मिळावी, तसेच मेडिक्लेम योजनेत आई-वडिलांचा समावेश करावा, या प्रमुख मागण्या मंजूर करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला जात आहे. 

यावेळी आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुकाध्यक्ष कॉ. प्रकाश कुंभार यांनी, या मोर्चात दहा हजार कामगार सहभागी होतील, अशी माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, या मोर्चाच्या माध्यमातून कामगारांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 

यावेळी, कॉ. शिवाजी मगदूम यांनी कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सत्ताधाऱ्यांना त्यांच्या खुर्च्या सोडायला लावू असा इशारा दिला . बैठकीसाठी कॉ. रामचंद्र नाईक, कॉ. अजित मगदूम, कॉ. संजय चौगुले, कॉ. दयानंद चव्हाण, कॉ. दिनकर सुतार, कॉ. सुनील पाटील, आणि कॉ. आनंदा देवार्डे यांसह तालुका कमिटीचे सदस्य उपस्थित होते. 

या मोर्चाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या समस्यांची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


*बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी विराट मोर्चा; २१ ऑगस्ट रोजी हजारो कामगार सहभागी होणार*