बातम्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला ३२ हजार वीजग्राहकांचा प्रतिसाद,४७१४ सौर प्रकल्प कार्यान्वित

pm solor scheme


By Administrator - 9/8/2024 6:18:07 PM
Share This News:



प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला ३२ हजार वीजग्राहकांचा प्रतिसाद,४७१४ सौर प्रकल्प कार्यान्वित

पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती; आणखी ८७५ सौर प्रकल्प पूर्ण

पुणे: दि. ०९ ऑगस्ट २०२४: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत ३१ हजार ९०४ घरगुती वीजग्राहक सहभागी झाले असून त्यातील ४ हजार ७१४ वीजग्राहकांकडे १९.३ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर आणखी ८७५ सौर प्रकल्पांचे कामे पूर्ण झाले असून उर्वरित मंजूर २६ हजार ३१५ सौर प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत.

घराच्या छतावरील १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरु आहे. या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विशेष म्हणजे या सौर प्रकल्पांसाठी सौर नेटमीटर महावितरणकडून देण्यात येत असून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यात येत आहे. सोबतच या योजनेसाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. 

गेल्या सहा महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्यात ५५.२ मेगावॅटसाठी १४,५६१ ग्राहकांनी तसेच सातारा- ८.५ मेगावॅटसाठी ३२८०, सोलापूर- १४.६ मेगावॅटसाठी ४८०६, कोल्हापूर- १७ मेगावॅटसाठी ५४९२ आणि सांगली जिल्ह्यात १०.५ मेगावॅटसाठी ३७६५ असे पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत ३१ हजार ९०४ घरगुती वीजग्राहकांनी १०६ मेगावॅट क्षमतेच्या छतावरील सौर प्रकल्पांसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज मंजूर झाले आहेत. यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यात ८.५ मेगावॅटचे १६६९, सातारा- १.६ मेगावॅटचे ५०५, सोलापूर- ३.१ मेगावॅटचे ८४०, कोल्हापूर- ४.६ मेगावॅटचे १२७२ आणि सांगली जिल्ह्यात १.५ मेगावॅटचे ४२८ घराच्या छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. 

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अतिशय घरगुती व गृहसंकुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या सौर प्रकल्पातून सुमारे २५ वर्ष मोफत वीज मिळेल. तसेच गरजेपेक्षा शिल्लक राहिलेली वीज महावितरण विकत घेत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. यामुळे वीजग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. घरगुती ग्राहक व गृहनिर्माण संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले. 

 छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. 


प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला ३२ हजार वीजग्राहकांचा प्रतिसाद,४७१४ सौर प्रकल्प कार्यान्वित