बातम्या
कागलच्या राजकारणात नवा ट्विस्ट: वीरेंद्र मंडलिक यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी
By nisha patil - 5/9/2024 2:12:37 PM
Share This News:
कागल तालुक्यातील राजकीय वातावरणात एक नवा वळण येत आहे. महायुतीकडून ॲड. वीरेंद्र मंडलिक यांना कागल विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची उत्स्फूर्त मागणी कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्र व शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते कोल्हापूर दौऱ्यावर होते. आदमापूर येथे संत बाळूमामा यांचे दर्शन घेतल्यानंतर झालेल्या पदाधिकारी बैठकीत कार्यकर्त्यांनी ॲड. वीरेंद्र मंडलिक यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली.
*मंडलिक गटाची राजकीय ताकद*
दिवंगत लोकनेते सदाशिव मंडलिक यांनी कागल तालुक्यातील राजकारणात आपला ठसा उमटवला होता. त्यांनी सहकार, दूध संस्था, पतसंस्था आणि अन्य माध्यमांतून कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे केले. या गटाची ताकद आजही माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कायम आहे. त्याच गटातून युवा नेतृत्व म्हणून ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी गटबांधणी करताना आपली खास ओळख निर्माण केली आहे.
युवा वयातच त्यांनी जिल्हा परिषद आणि गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सहभाग घेतला आहे. शिवाय, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक म्हणून त्यांनी शिवसेनेत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांचे जाळे उभे केले आहे.
*महायुतीला विजयासाठी उमेदवारीची मागणी*
कागल, गडहिंग्लज आणि आजरा या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या कागल मतदारसंघात सुमारे साडेतीन लाख मतदार आहेत. कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे की, ॲड. वीरेंद्र मंडलिक यांना उमेदवारी दिल्यास ते महायुतीला विजय मिळवून देतील. त्यांच्या पाठीशी मंडलिक गटाचे सर्व कार्यकर्ते आहेत, ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतही महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
*शिंदे गटाची भूमिका उत्सुकतेचा विषय*
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मंडलिक गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. आता श्रीकांत शिंदे यांची भूमिका काय असेल, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे.
कागलच्या राजकारणात नवा ट्विस्ट: वीरेंद्र मंडलिक यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी
|