बातम्या
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 15 जुलैपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन सी.एस.सी केंद्रधारकांनी अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास संपर्क साधा
By nisha patil - 2/7/2024 7:37:05 PM
Share This News:
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये ही योजना राबविण्यात येत असून या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतक-यांनी अंतिम मुदत दिनांक 15 जुलै 2024 अशी आहे. त्या अनुषंगाने सामुहिक सेवा केंद्र (सी एस सी) धारकाकडून केवळ 1 रुपया भरुन पिक विमा योजनेअंतर्गत सहभागाची नोंदणी करावी. सी.एस.सी केंद्र धारकांनी अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास संबंधित विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच तक्रार नोंद करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 14599/ 14447 असा आहे.व्हॉटस ॲप क्रमांक- 9082698142, फोन नं. 011-49754923 व 9082698142 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळे शेतक-यांना केवळ 1 रुपया भरुन प्रधानमंत्री फसल बीमा योजना पोर्टल वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र व सामुहिक सेवा केंद्र (सी एस सी) यांच्या मार्फत योजनेत सहभागाची नोंदणी करता येईल. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र (सी एस सी) केंद्राने विमा कंपनीकडून प्रति अर्ज रक्कम 40 रुपये देण्यात येतात. त्यामुळे काही सामुहिक सेवा केंद्र (सी एस सी) केंद्राने शेतक-यांकडून 1 रुपायाव्यतिरिक्त कोणतीही जादा रक्कम घेतल्यास ते केंद्रधारक कारवाईस पात्र राहतील.
शेतक-यांनी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दिनांक 15 जुलै 2024 अशी आहे. अंतिम दिनांकाची वाट न पाहता अधिसुचित महसूल मंडळातील भात, खरीप ज्वारी, नागली, भुईमुग व सोयाबीन पिकासाठी सर्व शेतक-यांनी पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा व आपले क्षेत्र संरक्षित करावे. अधिक माहीतीसाठी कृषि विभागातील क्षेत्रिय स्तरावरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी सर्व सी.एस.सी केंद्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 15 जुलैपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन सी.एस.सी केंद्रधारकांनी अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास संपर्क साधा
|