बातम्या
कांद्याच्या दरात मोठी घसरण: शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
By nisha patil - 12/18/2024 10:45:14 PM
Share This News:
कांद्याच्या दरात मोठी घसरण: शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. मागील 15 दिवसांत कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी 1,900 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, तर जास्तीत जास्त 2,800 रुपये मिळत आहे.
काही आठवड्यांपूर्वी 5,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटलवर गेलेल्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. देशांतर्गत आवक वाढल्याने आणि निर्यातीत अडथळे आल्याने दर खाली आले आहेत. शेतकऱ्यांनी निर्यातशुल्क तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे, अन्यथा त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.
सरकारने कांद्याच्या खुलेआम विक्रीसाठी प्रयत्न केले असले तरी पुरवठा समाधानकारक नाही. देशभरातील किरकोळ बाजारात कांद्याचे दर 60-80 रुपये प्रति किलो होते, परंतु आता ते 2000-2500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढला गेला नाही, तर या संकटाचा मोठा फटका संपूर्ण कृषी व्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे.
कांद्याच्या दरात मोठी घसरण: शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
|