बातम्या
इचलकरंजी रेल्वेसाठी महिन्याभरात निधी उपलब्ध करुन देणार खास. धैर्यशील माने यांचे आश्वासन
By nisha patil - 8/21/2023 4:53:11 AM
Share This News:
इचलकरंजी / प्रतिनिधी इचलकरंजी शहराच्या विकासासाठी रेल्वेची नितांत गरज असून हातकणंगले - इचलकरंजी नव्या रेल्वे प्रकल्पासाठीचा निधी महिन्याभरात उपलब्ध करू,असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी आज इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या बैठकीत दिले.
नियोजित हातकणंगले - इचलकरंजी या आठ किलोमीटरच्या मार्गाला केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देऊन अनेक वर्षे झाली. पण अद्याप या मार्गाला पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने काम रखडले आहे. सदर मार्गाला राज्य व केंद्र सरकारचा निम्मा निम्मा जवळपास २०० कोटी रुपये निधी अपेक्षित आहेत. पण राज्य सरकार आपला हिस्सा भरण्यास तयार नसल्याने पुढील कामकाज ठप्प झाले होते. याची दखल घेत इचलकरंजी रेल्वे कृती समितीने गेल्या आठवड्यात खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घोषित केला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.
याची दखल घेत खासदार माने आज इचलकरंजीत आले. व त्यांनी रेल्वे कृती समितीच्या सदस्यांची बैठक बोलावली. यावेळी गुरुनाथ म्हातुकडे, श्रीनिवास शर्मा, धर्मराज जाधव यांनी वस्त्रोद्योग व्यवसायासाठी व त्याच्या वाढीसाठी रेल्वेची गरज असल्याने रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून आम्ही गेली दहा-बारा वर्षे प्रयत्न करीत आहोत. वेळोवेळी सरकार लोकप्रतिनिधी खासदार यांना निवेदन देऊनही काम अद्याप सुरू झाले नसल्याचे सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावर खासदार माने म्हणाले, इचलकरंजी महानगरपालिका झाली आहे. शहर वाढत आहे. त्याचा सर्वांगीण विकास होत असताना इचलकरंजीसाठी रेल्वेची गरज असल्याचे प्रतिपादन करीत आपण गेली चार वर्ष त्याचा सतत पाठपुरावा करत आहोत. सध्या दोन कोटी रुपये केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजूर केले आहेत. त्यात वाढ होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी - हातकणंगले रेल्वेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची कोल्हापुरात घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण पाठपुरावा करू. दिवाळीपूर्वी राज्याचे १००कोटी व केंद्र सरकारचे १०० कोटी असे जवळपास २०० कोटी रुपये उपलब्ध करून देऊ व लवकरच या मार्गाच्या कामाला गती प्राप्त होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. खासदार धैर्यशील माने यांच्या या आश्वासनानंतर रेल्वे कृती समितीने आपले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे जाहीर केले.
प्रारंभी मनोहर जोशी यांनी स्वागत केले. तर पांडुरंग पिसे यांनी आभार मानले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, शहराध्यक्ष भाऊसाहेब आवळे, विठ्ठल चोपडे, प्रकाश पाटील, मनोज साळुंखे, रवींद्र लोहार, शहाजी भोसले त्यांच्यासह रेल्वे कृती समितीचे सदस्य दीपक पंडित, महेंद्र जाधव, सागर रावण, नंदकुमार बांगड, अशोक पाटनी, भगवंत भुते, जगदीश दायमा, अजय दाधीच आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इचलकरंजी रेल्वेसाठी महिन्याभरात निधी उपलब्ध करुन देणार खास. धैर्यशील माने यांचे आश्वासन
|