बातम्या

योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

Meeting at the Collectors office for the implementation of the scheme


By nisha patil - 2/7/2024 7:39:20 PM
Share This News:



 महाराष्ट्र राज्यातील महिलांना व मुलींना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला सुरुवात झाली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.

सोमवारी १ जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यातील माता - भगिनींसाठी सुरु केलेली योजना असून या योजनेपासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकीत दिल्या. योजनेच्या अमलबजावणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. 
     

या बैठकीत सूचना देताना .राजेश क्षीरसागर यांनी, योजनेची अंमलबजावणी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात झाली पाहिजे. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका बालविकास प्रकल्प अधिकारी शहरी भागात वॉर्ड ऑफिसर यांनी अत्यंत जबाबदारीने काम करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शहरी भागात अर्ज प्रक्रिया गतिमान करण्यासाठी नॅशनल अर्बन रिन्यूअल मिशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या बचत गटांचे सहाय्य घ्यावे. सेतू सुविधा केंद्राकडून अर्ज भरून घेण्यासाठी काही रक्कम ची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत याबाबत जिल्हाधिकारी यांनी सेतू चालकांची बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना द्याव्यात व असे गैरप्रकार होत असतील तर त्यांच्यावर कारवाई करून प्रसंगी त्यांची परवानगी रद्द करावी. मार्च २०२४ पर्यंत काढलेले उत्पन्नाचे दाखले या योजनेसाठी ग्राह्य धरले जातील तसेच जुना रहिवास दाखला असल्यास नव्याने काढण्याची आवश्यकता नाही याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या
 

    या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.,  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वाईगडे संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक