बातम्या

कोल्हापूरात क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरू करा : आमदार जयश्री जाधव

Re open Krida Prabodhinis Residential Football Training Center in Kolhapur


By nisha patil - 3/7/2024 6:13:11 PM
Share This News:



कोल्हापूर : येथील क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरू करावे अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली निवेदनाद्वारे केली आहे.  आज आमदार जयश्री जाधव यांनी मंत्री बनसोडे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत लवकरच क्रीडा आयुक्तांच्या बरोबर बैठक घेऊ असे आश्वासन मंत्री बनसोडे यांनी यावेळी दिले.
 

निवेदनातील माहिती अशी, संस्थान काळापासून कोल्हापूरकरांच्या नसानसांत फुटबॉल खेळ खोलवर रुजला आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या फुटबॉल प्रेमामुळे फुटबॉलला राजाश्रय मिळाला. आता चांगला लोकाश्रय मिळत असल्याने फुटबॉल वाढत आहे.  फुटबॉल कोल्हापूरची अस्मिता बनली असून, प्रत्येक नागरिकांच्य हृदयात फुटबॉल खेळालाही स्थान आहे. पेठापेठांमध्ये फुटबॉल प्रत्येक घरातील युवक, युवती संघातून खेळत आहेत. यामुळे कोल्हापुरात फुटबॉलची गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ होत आहे. त्यामुळे १६ जुलै १९९६ रोजी तत्कालीन सरकारने कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये कुस्ती आणि फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रास मंजुरी दिली. त्यानंतर काही दिवस आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तयार झाले. काही दिवस हे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरू राहिले. मात्र, क्रीडा व युवा सेवा संचालनालयाने निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र कुणालाही समजण्याआधीच पुण्याला हलविले आहे. त्यामुळे तंत्रशुद्ध फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या खेळाडूंना पुण्यास जावे लागणार आहे. हा कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंच्यावर अन्याय आहे.
 

फुटबॉल पंढरी म्हणून कोल्हापूरची राज्यात व देशात ओळख निर्माण आहे. येथील फुटबॉल खेळाडूंनी राज्यात व देशात नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळे येथील स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना तंत्रशुद्ध अद्यावत प्रशिक्षण देण्यासाठी येथील क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनात केली आहे.


कोल्हापूरात क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरू करा : आमदार जयश्री जाधव