आरोग्य
हृदयाची मूक वेदना
By nisha patil - 2/19/2025 7:39:50 AM
Share This News:
आयुष्य, अनियमित जीवनशैली, जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव आदी गोष्टींचा दुष्परिणाम म्हणजे आज खूपच कमी वयात मधुमेह, रक्तदाब, हायपर टेन्शन आदी अनेक आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परिणामी, हृदयाचे आरोग्यही धोक्यात आले असून खूप कमी वयात हृदयविकाराचा सामना करावा लागत आहे.
हृदयविकाराचा झटका येण्या पूर्वी आपले शरीर आपल्याला वेगवेगळ्या लक्षणा मार्फत धोक्याचा इशारा देत असते. काही जण या लक्षणांची गांभीर्याने दखल घेतात, तर काही जण कामाच्या व्यापात या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण यामुळे हे दुखणे जीवघेणे सुद्धा ठरू शकते. काही जणांना तर सायलेंट हार्ट अटॅक ही (हृदयविकाराचा मूक झटका) येऊन गेलेला असतो. हृदयविकाराचा झटका येत असल्याचे जेव्हा समजत नाही, तेव्हा त्या झटक्याला हृदयविकाराचा मूक झटका म्हणतात. हृदयविकाराचा झटका येऊन गेल्या नंतर काही काळाने वैद्यकीय तपासणी केली असता ही बाब लक्षात येते.
हृदयविकाराचा हा मूक झटका कधी येऊन गेला हे तोपर्यंत (वैद्यकीय चाचणी होई पर्यंत) रुग्णांना माहीतही नसते. वैद्यकीय भाषेत याला सायलेंट इस्केमिया (हृदयातील स्नायूमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणे) असे म्हणतात. सर्वसामान्यपणे हृदयविकाराचा झटका येताना छातीत दुखते किंवा अस्वस्थ वाटते, असा आपल्या पैकी अनेकांचा सर्रास समज असतो. पण काहींच्या बाबतीत असे घडत नाही. छातीत दुखण्याची, अस्वस्थ वाटण्याची किंवा इतर कोणतीच तक्रार त्यांना जाणवत नाही आणि त्यामुळेच हृदयविकाराचा मूक झटका आपल्याला येऊन गेल्याचे त्यांना कळतही नाही.
परिणामी, हृदयविकाराचा असा मूक झटका दुर्लक्षिला जाऊ शकतो. पण ही गोष्ट दुर्लक्ष करण्याजोगी अजिबात नाही हृदयविकाराच्या मूक झटक्यांचेही आरोग्यावर तेवढेच गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्या पूर्वी जाणवणाऱ्या पारंपरिक लक्षणांकडे जेवढ्या गांभीर्याने पाहिले जाते, तेवढ्याच गंभीरतेने या मूक झटक्या कडेही पाहायला हवे. हृदयविकाराचा असा झटका वेदने शिवाय आला, तरी त्यामुळे होणारी आरोग्याची हानी ही नेहमी सारख्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होते तशीच असते.
कोणत्याही व्यक्तीला जेव्हा हृदयविकाराचा धक्का बसतो, तेव्हा त्याच्या हृदयाच्या काही भागातील रक्तपुरवठा हा अपुऱ्या प्रमाणावर होत असतो. परिणामी, हृदयाची रचना बिघडते, हृदयाचा एखादा भाग ज्या रक्तवाहिनी द्वारे होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर अवलंबून आहे, त्या रक्तवाहिनी मध्ये गुठळ्या होणे हे हृदयविकाराचा झटका येण्यामागचे सर्वसामान्यपणे आढळणारे कारण आहे. रक्तवाहिनीला छेद जाऊन त्यात प्लाक जमा होऊन रक्त साकळल्याने रक्तवाहिनीमध्ये गुठळी तयार होते आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवते.
सामान्यपणे हृदयविकारासाठी जे घटक कारणीभूत असतात, तेच घटक हृदयविकाराच्या मूक झटक्या साठीही कारणीभूत ठरत असतात. मधुमेह, स्थूलपणा, उच्च रक्तदाब, धूम्रपान, तंबाखूसेवन या आधी येऊन गेलेला हृदयविकाराचा झटका, बैठी जीवनशैली आणि हृदयविकाराची कौटुंबिक पार्श्वभूमी हे हृदयविकार येण्यासाठी सर्वसामान्यपणे आढळणारे घटक आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.
हृदयाची मूक वेदना
|