बातम्या

'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमांतंर्गत बालकांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन

Appeal to ensure admission of children under


By nisha patil - 3/27/2025 4:31:29 PM
Share This News:



'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमांतंर्गत बालकांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन

चैत्रशुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा पवित्र समजला जातो. या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा. या उद्देशाने 'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविला जातो. या अनुषंगाने गुढी पाडव्यादिवशी आपल्या दाखलपात्र (6 वर्षे पूर्ण असणाऱ्या) बालकाचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करुन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा शुभारंभ करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे.
                                

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 100 टक्के पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृती, स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मार्गदर्शन, डिजीटल शाळा, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. शासकीय तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख होण्यास मदत झाली असल्याचेही डॉ. शेंडकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.


'गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमांतंर्गत बालकांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन
Total Views: 9