बातम्या

बहुगुणी म्हणून वर्णिलेल्या अश्‍वगंधा

Ashwagandha described as polyvalent


By nisha patil - 5/18/2024 5:56:04 AM
Share This News:




भारतीय आयुर्वेदामध्ये बहुगुणी म्हणून वर्णिलेल्या अश्‍वगंधा या वनस्पतीकडे सार्‍या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अशाच प्रकारची एक वनस्पती चीनमध्ये फार लोकप्रिय आहे. तिला जिनसेंग असे म्हणतात. त्यामुळेच वैद्यकीय शास्त्रात अश्‍वगंधा वनस्पतीला भारतीय जिनसेंग असे संबोधले जायला लागले आहे. ही वनस्पती माणसाच्या अंगातील जोम वाढविण्यास कारणीभूत ठरते आणि आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते.

अश्‍वगंधा वनस्पतीच्या पानांमध्ये ऍडाप्टोजीन्स् असतात, जे माणसाचा तणाव, थकलेपणा आणि चिंता यामुळे होणार्‍या दुष्परिणामावर प्रभावी ठरतात. माणसाच्या सार्‍या चयापचय क्रीया नियंत्रणात ठेवण्यास ते उपयुक्त ठरतात. शिवाय मेंदूची क्षमता वाढविण्यास सुद्धा ते फायदेशीर ठरतात.

भारतात अश्‍वगंधा वनस्पती परंपरेने वापरली जात असली तरी पाश्‍चात्य देशांमध्ये अगदी अलीकडे तिच्यावर संशोधन सुरू झाले आहे आणि या संशोधनाअंती तिच्यात अनेक गुणधर्म असल्याचे आढळले आहे. काही अमायनो ऍसिडस्, फॅटी ऍसिडस् सुद्धा या वनस्पतीत असल्याचे आढळले आहे. त्याशिवाय आधुनिक वैद्यक शास्त्राला आव्हान देणार्‍या अल्झायमर्स आणि कर्करोग याही रोगांवर अश्‍वगंधा इलाज करू शकते असे संशोधकांना वाटत आहे.

शरीरातील चरबी कमी करणे, ब्लड शुगर संतुलित ठेवणे आणि मलेरियाचा प्रतिकार करणे असेही गुणधर्म अश्‍वगंधा वनस्पतीत असावे असे संशोधकांना वाटत आहे. असे असले तरी गरोदर महिलांनी अश्‍वगंधेचा वापर करू नये, असा इशारा संशोधकांनी केला आहे. मानसिक तणाव फार वाढला, खूप थकल्यासारखे वाटायला लागले आणि चिडचिड व्हायला लागली तर मात्र अश्‍वगंधाचा विचार करायला हरकत नाही, असे संशोधकांचे मत आहे.


बहुगुणी म्हणून वर्णिलेल्या अश्‍वगंधा