बातम्या
कंबरदुखीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय......
By nisha patil - 5/8/2024 7:26:59 AM
Share This News:
पाठीच्या खालच्या भागात, कमरेत होणाऱ्या वेदानांमुळे लोक अगदी त्रस्त झालेले दिसतात.
पूर्वी असा समज होता की कंबरदुखी ही फक्त म्हातारपणी उद्भवणारी गोष्ट आहे.
पण आता तसं राहिलेलं नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक तरुण लोकही ह्या समस्येने ग्रस्त असलेले दिसून येतात.
स्त्रियांमध्ये देखील मासिक पाळी दरम्यान किंवा गर्भवती अवस्थेत हे दुखणे जास्त प्रमाणात आढळून येते.
बहुतेक वेळा लोक कंबरदुखी वर वेदनशामक औषधे घेतात.
परंतु ह्यावर अनेक चांगले घरगुती उपाय देखील आहेत.
कोणते ते आपण ह्या लेखात पाहूया. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सची कमतरता, संधिवात, स्नायूं वर येणारा ताण, चुकीच्या पद्धतीचा व्यायाम ह्या आणि अशा अनेक कारणांमुळे कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.
आज आपण ह्या दुखण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय हयाबद्दल ह्या लेखात आणखी जाणून घेऊ या.
कंबर दुखी म्हणजे काय...
पाठीच्या कण्याचा खालचा भाग आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भार तोलून धरतो.
जेव्हा आपण खाली वाकतो, किंवा वाकून काही जड वस्तु उचलतो तेव्हा देखील ह्या भागावर जास्त भार येतो.
आपण बराच वेळ एक जागी बसलो तरी देखील त्याच भागावर शरीराचा सर्व भार पडतो.
ह्या कारणांमुळे आपल्या पाठीच्या कण्याला आधार देणारे स्नायू, पेशी आणि लिगमेंट्स वर वारंवार ताण येतो.
आणि कंबर दुखी सुरू होते. अशा प्रकारच्या दुखण्याला स्ट्रेस एंज्युरी म्हणतात.
हे टाळण्यासाठी आपण एका स्थितीत जास्त वेळ न बसणे, कामातून ब्रेक घेणे असे उपाय करू शकतो. त्यामुळे स्नायूंचे आखडणे कमी होते
कंबरदुखीची कारणे...
आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे वात आणि कफ दोषामूळे कंबरदुखी उद्भवते.
यामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात.
अर्थात ह्या दुखण्याची इतरही कारणे आहेत. कोणती ते आपण पाहूया...
१) ताण तणाव (स्ट्रेस)... आपल्या मनावर ताण आला की आपले स्नायू आखडतात.
ह्याचा सर्वाधिक परिणाम पाठीच्या स्नायूंवर होतो.
त्यामुळे आपण स्ट्रेस मध्ये असलो की पाठ कंबरदुखी सुरू होते.
२) नवीन तंत्रज्ञान...
नवीन तंत्रज्ञानाने जग तर जवळ आणले आहे पण त्यामुळे लोकांच्या हातात सतत मोबाइल फोन, टॅबलेट्स दिसु लागले आहेत.
फोन किंवा टॅब्लेट वर सतत काम करताना मान खाली वाकवली जाते आणि त्यामुळे व्यक्तीचे पोस्चर बिघडते.
हळूहळू मानेकडून दुखणे सुरू होऊन ते खाली पाठ व कमरेपर्यंत पोचते. व कंबरदुखी सुरू होते.
३) स्नायूना दुखापत...
कंबरदुखी ही अनेक कारणांमुळे होऊ शकते.
मानेपासून ते पाठीपर्यंतचे स्नायू जर दुखावले असतील, त्यांना काही सूज वगैरे आली असेल तरीही कंबर दुखीचा त्रास होऊ शकतो.
त्यामुळे दुखण्याचे मूळ कारण काय ते शोधणे खूप आवश्यक असते.
त्यानुसार त्यावर उपचार होऊ शकतात.
४. स्लिप डिस्क...
पाठीच्या कण्याच्या रचनेत ज्या चकत्या असतात त्यांच्यामध्ये असलेली गॅप जर वाढली किंवा कमी झाली, तसेच जर त्या चकत्यांना काही दुखापत झाली, तर पाठ आणि कंबर दुखू शकते.
काही वेळा स्लिप डिस्क हा आजार आनुवंशिक देखील असू शकतो.
कंबरदुखी होऊ नये म्हणून काय करावे...?
१) योग्य पॉस्चर...
जेव्हा काम करण्यासाठी सलग बराच वेळ बसावे लागते तेव्हा आपल्या पॉस्चर चा विचार जरूर करावा.
आरामदायक खुर्चीवर योग्य तऱ्हेने बसावे. बसल्यावर हातांना देखील सपोर्ट मिळेल ह्याची दक्षता घ्यावी. सलग पूर्ण वेळ बसून न राहता अधूनमधून उठून उभे रहावे. थोडेसे चालून यावे.
थोडे stretching करावे. ह्यामुळे पाठीचा कणा आणि कंबर ह्यांचे आरोग्य टिकून राहते.
२) कम्प्युटर, फोन वापरताना घ्यायची काळजी...
जेव्हा तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल तेव्हा स्क्रीन डोळ्यांच्या समोर येईल अशा पद्धतीने तो ठेवा.
मान वाकवून स्क्रीन कडे पाहणे टाळा. तसेच जर मोबाइल हातात असेल तर त्याकडे पाहताना फक्त नजर खाली झुकवा, मान सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
३) चालणे...
सतत बसून काम करण्यापेक्षा काही कामे चालत करा, जसे की जर कुणाला फोन करायचा असेल तर चालत राहुन बोला किंवा काही मेसेज द्यायचा असेल तर प्रत्यक्ष जाऊन द्या.
ह्यामुळे तुमचं काही पावलं चालणं होईल.
४) जड वस्तु उचलताना घ्यायची काळजी...
एकदम वाकून जड वस्तु उचलू नका. अन्यथा पाठ आणि कंबरेवर ताण येऊन दुखणे सुरू होऊ शकते.
५) सुयोग्य आहार...
योग्य पद्धतीचा आहार घेऊन वजन आटोक्यात ठेवा. स्थूल व्यक्तीना ह्या दुखण्याचा धोका जास्त असतो.
कंबरदुखीवर घरगुती उपाय....
१) आलं...
कंबरदुखीमध्ये आल्याचा उपयोग औषधाप्रमाणे केला जातो.
दुखऱ्या भागावर आल्याची वाटून केलेली पेस्ट लावण्याने बराच फरक पडतो. तसेच ताज्या आल्याचे ४,५ तुकडे दीड कप गरम पाण्यात उकळून नंतर ते पाणी गार करून प्यावे.
किंवा आले, काळी मिरी आणि लवंग घालून उकळलेला हर्बल चहा घ्यावा.
आल्यामध्ये असणाऱ्या अँटी इंफ्लेमेट्री तत्वांमुळे कंबरदुखीच्या वेदना कमी होतात.
२) तुळस...
एक कप पाण्यात तुळशीची ८, १० पाने उकळून ते पाणी गार करून दररोज प्यावे. ह्यामुळे कंबरदुखी कमी होण्यास निश्चित मदत होते.
३) खसखस...
खसखस ही कंबरदुखीवर अत्यंत गुणकारी आहे. दूध आणि पिठीसाखर घालून केलेली खसखशीची खीर पिणे हा कंबरदुखीवरचा रामबाण उपाय आहे.
४) लसूण...
रोज सकाळी रिकाम्यापोटी लसणाच्या ४, ५ पाकळ्या खाण्यामुळे फक्त कंबरच नाही तर शरीराच्या इतरही भागांना खूप उपयोग होतो.
तसेच नारळाच्या तेलात थोड्या लसूण पाकळ्या घालून ते तेल गरम करून दुखऱ्या भागावर त्या तेलाने मसाज केला की बराच आराम मिळतो.
५) बर्फाने शेकणे...
बर्फाचे खडे एका रबरी पिशवीत घालून त्याने दुखऱ्या भागावर शकणे लाभदायक ठरू शकते. दर दोन तासांनी हा उपाय करावा.
६) हर्बल ऑइल...
घरी केलेले अथवा तयार मिळणाऱ्या हर्बल तेलाने कमरेची मालीश केली असता बराच आराम मिळतो.
७) वाफ घेणे...
कमरेच्या दुखऱ्या भागावर वाफेने शेक घेणे हा देखील आयुर्वेदात सांगितलेला प्रभावी उपाय आहे.
गरम पाण्यात टॉवेल बुडवून तो पिळून दुखऱ्या भागावर ठेवावा. ही क्रिया पुनःपुन्हा करावी. ह्यामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होऊन रक्ताभिसरण सुधारते व दुखणे कमी होते.
८) दूध...
दूध हे कॅल्शियम चे प्रमुख स्त्रोत आहे. आणि कॅल्शियम मुळे हाडांना बळकटी मिळते. त्यामुळे नियमित दूध पिणे हे पाठ, कंबर दुखण्यावर उत्तम औषध आहे.
कंबरदुखीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय......
|