बातम्या
खेळताना मुलांच्या दातांची काळजी घेणे गरजेचे
By nisha patil - 8/13/2024 9:27:05 AM
Share This News:
मुंबईतील पालिका शाळेतील १२.३७ टक्के मुलांचे पुढचे २ पक्के दात खेळताना पडल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले. हा धोका टाळण्यासाठी शाळेत मुलांना खेळताना माऊथ गार्ड वापरणे बंधनकारक केले पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या गार्डमुळे त्यांचे दात वाचवता येऊ शकतात. मुलांना खेळताना गुडघ्याला, हाताच्या कोपराला अनेकदा मार लागतो, खरचटते. यासाठी पालक काळजी घेताना दिसतात. अशाच प्रकारे दातांचीही काळजी घेतली पाहिजे.
खेळताना केवळ शरीरालाच नव्हे तर दातांनाही मार लागतो. यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या शाळांमधील सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती खूपच गंभीर आहे. मुंबईतील शासकीय दंत रुग्णालय आणि महाविद्यालयातील बालदंत चिकित्सक विभागातील डॉक्टरांनी मुंबईतील महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये १० पालिका शाळांमधील २ हजार विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, शाळेत मैदानी खेळ खेळताना धक्काबुक्की, सायकलिंग किंवा उंच उड्या मारताना पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना समोरचे दोन पक्के दात गमवावे लागले आहेत. एकुण १२.३७ टक्के मुलांचे पुढचे दात पडल्याचे आढळून आले.
मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये दात पडण्याचे प्रमाण जास्त आहे. मुलांच्या दात तुटण्याचे प्रमाण १८.१ टक्के तर मुलींचे ९.६ टक्के आहे. यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यासह दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. पालकांना आणि शिक्षकांना मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी हेच अनेकदा माहिती नसते. दातांचे नुकसान टाळण्यासाठी मुलांना खेळायला पाठवताना माऊथ गार्ड देणे गरजेचे आहे. बाजारात विशिष्ट आकारात हे माऊथ गार्ड उपलब्ध असतात. वेगवेगळ्या आकाराचे माऊथ गार्ड दंत चिकित्सकाच्या मदतीने तयार करून मिळतात.
खेळताना मुलांच्या दातांची काळजी घेणे गरजेचे
|