बातम्या

कानाला सतत हेडफोन लावल्यानं बॅक्टेरिया कान पोखरतात! बहिरेपणासह कानात इन्फेक्शनचा वाढता धोका.....

Constantly putting headphones on the ear causes bacteria to enter the ear


By nisha patil - 5/6/2024 6:07:10 AM
Share This News:



जी पण गोष्ट करायची ती स्टाइलमध्ये. आता म्युझिक ऐकायचंच उदाहरण घ्या, रेडिओवरपण गाणी लागतात. पण बाजूला रेडिओ लावलाय आणि आपण गाणी ऐकतोय असं आता होत नाही. आपल्याला मोबाइलमध्ये गाणी ऐकायची सवय असते. शिवाय ती ऐकताना आता कानात हेडफोन्स लागतात. हेडफोन , इयरफोन ही आपल्यासाठी महत्वाची ॲक्सेसरी झाली आहे. पण कानाला हेडफोन लावून गाणी ऐकल्याने कानात जिवाणुंची संख्या वाढते, हे माहिती आहे का तुम्हाला?
आता तुम्ही म्हणाल हेडफोन, म्युझिक यामध्ये जिवाणू आले कुठून? हेडफोनमुळे किती स्पष्ट आवाज येतो, शिवाय आपल्या आवडीची गाणी ऐकताना बाहेरच्या आवाजाचा अडथळा येत नाही. मग हे कानात जिवाणू वाढण्याचा काय संबंध आहे?

हेडफोन वापरल्याने कानात जिवाणूंची संख्या वाढते, हे सांगितलं तर कुणालाच खरं वाटत नाही. पण हे खरं आहे. अभ्यासकांनी यासंबंधीचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला आहे. २००८ साली झालेला मणिपाल विद्यापीठाचाही अभ्यास सांगतो की इअरफोन, हेडफोडचा अतीवापर केल्यानं भारतात कानाशी संबंधित आजारांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. कानाला हेडफोन लावल्याने असं काय होतं की, ज्यामुळे कानातल्या जिवाणूंची संख्या वाढते हे समजून घेणं आवश्यक आहे.

हेडफोन आणि जिवाणूंचा काय संबंध...?
अभ्यासक म्हणतात की, कानाला हेडफोन लावून गाणी ऐकणं यात वाईट काही नाही. पण हेडफोन्स आपण किती वेळ वापरतो, कोणते हेडफोन्स वापरतो , कसे वापरतो यावर हेडफोनमुळे कानांवर होणारे दुष्परिणाम अवलंबून असतात. हेडफोन वापरल्याने कानात एका तासात ७०० टक्के जिवाणूंची निर्मिती होते ही बाब थाप नसून खरी आहे. आपल्या कानाची रचना बघता इतक्या मोठ्या प्रमाणात जिवाणूंची संख्या वाढल्यास कान ते सहन करु शकत नाही. आपण जर रोजच तासनतास कानाला हेडफोन लावून म्युझिक ऐकत असू किंवा एखादा कार्यक्रम पाहत असू तर त्याचा परिणाम कानावर होणारच. मग त्यामुळे कान दुखणे, कमी ऐकू येणे यासारखे त्रासही उद्भवतात.

हेडफोन बनवताना जी सामग्री वापरली जाते, त्यात प्लॅस्टिक, लेदर यांचा वापर केलेला असतो. या गोष्टींवर धूळ , घाण जमा होते. हेडफोन्स वापरताना त्यावर बसलेली धूळ , घाण स्वच्छ न करताच ते कानाला लावले तर ते कानात जावून कानातल्या जिवाणुंची संख्या वाढते. कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
कानाला हेडफोन लावल्यावर कानाच्या तापमानात बदल होतो. हेडफोन्समुळे नैसर्गिक हवा कानात जाण्यास अडथळा निर्माण होतो. बाहेरील हवा कानात जावू शकत नसल्याने कानाचं तापमान वाढतं. कानाचं हे वाढलेलं तापमान जिवाणूंच्या निर्मितीसाठी पोषक असतं. त्यामुळे कानाला हेडफोन्स लावले की कानात बॅक्टेरिया वाढतात.

घरात बरेचदा एकच हेडफोन असतो. तोच हेडफोन घरातल्या सर्व व्यक्ती वापरतात. यातूनही कानात जंतूचा संसर्ग होतो. म्हणून अभ्यासक इतरांचा हेडफोन आपण वापरताना तो स्वच्छ करुन घेणे, निर्जंतुक करणे या गोष्टींना महत्व देतात. शिवाय आपले किंवा इतर कोणाचे कान स्वच्छ नसले तर एका व्यक्तीच्या कानातले जंतू दुसऱ्या व्यक्तीच्या कानात प्रवेश करतात. यामुळे संसर्ग होवून त्याचा परिणाम कानावर होतो. हेडफोन जास्त वापरल्याने केवळ कानात जिवाणुंची संख्याच वाढते असं नाही तर 'व्हर्टिगो' हा आजारही जडतो.

हेडफोन वापरण्याचा ६०-६०-९० नियम...
हेडफोन वापरताना ऑस्ट्रेलियन हिअरिंग हब यांनी कानाचं आरोग्य जपणारा ६०-६०-९० हा सांगितलेला नियम नीट समजावून घेणं आवश्यक आहे. या हबमधील अभ्यासकांच्या मते कानाला हेडफोन लावून काही ऐकताना तो आवाज ६०टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. एका वेळी ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ कानाला हेडफोन लावून ऐकू नये. आणि दिवसभरात हेडफोनचा वापर हा ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ नसावा. ६०-६०-९०चा नियम काटेकोरपणे पाळून हेडफोन वापरण्याची काळजी घेण्याचा सल्ला येथील अभ्यासक देतात. आता हेडफोन लावून गाणी ऐकताना फक्त कम्फर्ट आणि स्टाइलचाच विचार नको करायला, उगीच बहिरेपणाही यायचा.

 


कानाला सतत हेडफोन लावल्यानं बॅक्टेरिया कान पोखरतात! बहिरेपणासह कानात इन्फेक्शनचा वाढता धोका.....