बातम्या
सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा निर्णय – आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 3/26/2025 12:18:38 AM
Share This News:
सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा निर्णय – आमदार राजेश क्षीरसागर
मुंबई, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या दुसऱ्या फेरीतील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही बाजूच्या नागरिकांना विश्वासात घेतल्यानंतर हद्दवाढीचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
हद्दवाढीबाबत सरकार सकारात्मक असून, लवकरच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. सन १९७२ पासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्द वाढलेली नाही, त्यामुळे शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. हद्दवाढ झाली तर महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळू शकेल, असेही आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, नगरविकास विभागाचे अधिकारी तसेच संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हद्दवाढीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार असून, विरोधकांनी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन करावे, असे आवाहनही आमदार क्षीरसागर यांनी केले. पुढील बैठकीत हद्दवाढीबाबत अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा निर्णय – आमदार राजेश क्षीरसागर
|