बातम्या

अंगणवाडीच्या दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी मागणी..

Demand for repair and security of Anganwadi


By nisha patil - 2/27/2025 2:48:56 PM
Share This News:



अंगणवाडीच्या दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी मागणी..

 सुनीता उदाळे यांचा पुढाकार

पन्हाळा तालुक्यातील कुमार विद्यामंदिर पन्हाळा शाळेतील अंगणवाडीच्या दुरुस्ती व मुलांसाठी टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा  सुनीता प्रकाश उदाळे यांनी केली आहे. यासोबतच बालकांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशीही विनंती त्यांनी नगरपरिषदेकडे केली आहे.

कुमार विद्यामंदिर पन्हाळा येथील अंगणवाडीत ८० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, सध्या इमारतीच्या पत्र्यांमध्ये आणि भिंतींमध्ये अंतर पडले असून त्यातून उंदीर व घुशी आत येत आहेत. त्यामुळे मुलांच्या पोषण आहारावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, अंगणवाडी परिसरात बेबी टॉयलेटची सोय नसल्याने मुलांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, बालकांच्या सुरक्षिततेसाठी अंगणवाडीत सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे, असे सुनीता उडाळे यांनी नमूद केले आहे. मुंबईतील बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर अशा सुरक्षाव्यवस्थेची गरज अधिकच भासू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरपरिषदेकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. लहान मुलांचे आरोग्य आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी सुनीता उडाळे,  वैभव मोरे, प्रवीण कुऱ्हाडे, रशिफ नगारजी, शितल कुमार गवंडी, निसार नगारजी, सचिन कांदे, सुशांत कांबळे, राकेश उदाळे आदी उपस्थित होते.


अंगणवाडीच्या दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी मागणी..
Total Views: 107